मध्यप्रदेश राज्यातील छत्तरपूर जिल्ह्यातील कुटी हे गाव भगवान हनुमानाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावातील हनुमान मंदिराचे एक अद्भूत वैशिष्ट्या आहे. या मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न जे करतात, त्यांच्यापैकी फार कमी जणांना ती पूर्ण करता येते. या प्रदक्षिणेला परिक्रमा असेही म्हटले जाते. असाही एक विश्वास आहे, की जी व्यक्ती ही परिक्रमा पूर्ण करणाच असा गर्व व्यक्त करते, किंवा असा गर्व ज्या व्यक्तीच्या मनात निर्माण होतो, ती व्यक्ती परिक्रमा पूर्ण करु शकतच नाही. अनेकांना असा अनुभव आला आहे, अशी चर्चा आहे.
या भगवान हनुमानाची परिक्रमा बरीच लांब अंतराची आहे. तसेच ती पूर्ण करण्यासाठी अनेक अवघड खडक आणि उंचसखल भाग पार करावे लागतात. साहजिकच, ही परिक्रमा कोणत्याही परिस्थितीत तशी अवघडच मानली जाते. या मंदिराचे व्यवस्थापन पंडित दिवाकर पयासी यांच्या कुटुंबाकडे पिढ्यानपिढ्या आहे. येथील भगवान हनुमानाच्या मूर्तीचा किंवा या मंदिराचा इतिहास कोणाला विशेष ज्ञात नाही. तथापि, हे पुरातन मंदीर असल्याचे बहुतेक तज्ञांचे म्हणणे आहे. या मंदिराचे व्यवस्थापन आणि पौरोहित्य करणाऱ्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार या कुटुंबाच्या जितक्या पिढ्या ज्ञात आहेत, त्या सर्व पिढ्यांमधील लोकांनी हे मंदीर आणि भगवान हनुमानाच्या मूर्तीची सेवा केली आहे. या मंदिराशी आणि मूर्तीशी अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. अनेक चमत्कार या भगवान हनुमानाने केले आहेत, असे अनेकांचे म्हणणे आहे. नि:संतान व्यक्तीना या भगवान हनुमानाच्या दर्शनाने संतानाची प्राप्ती होते, असा दृढ विश्वास व्यक्त केला जातो.
या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्या असे की मंदिराच्या परिसरात आग पेटविली आणि धूर झाला, की ही मूर्ती अदृष्य होते. अर्थात, या वैशिष्ट्यासंबंधी दुमत आहे. काही लोक ही केवळ भाविकांची श्रद्धा आहे, असे मानतात. तर अनेक भाविकांचा तसा ठाम विश्वास आहे. एकंदरीत, हे भगवान हनुमान अत्यंत प्रसिद्ध आहेत.









