संरक्षित शरीराला झाली 100 वर्षे
100 वर्षांपूर्वी 2 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता, तिचे शरीर संरक्षित करून ठेवण्यात आले होते. आता याला ‘जगातील सर्वात सुंदर ममी’ ठरविण्यात आले आहे. रोसालिया लोम्बार्डोचे निधन 2 डिसेंबर 1920 रोजी तिच्या दुसऱया जन्मदिनापूर्वी झाले होते. न्युमोनियामुळे तिचा मृत्यू झाला होता.
निधनानंतर तिच्या शरीराला नॉर्थर्न सिसिलीमध्ये पालेर्मोच्या कॅपुचिन कॅटाकॉम्बसमध्ये संरक्षित आणि प्रदर्शित करण्यात आले होते. हे शरीर 100 वर्षांनंतरही तेथेच आहे. रोसालियाचे शरीर पर्यावरणीय घटकांमुळे खराब होऊ नये म्हणून नायट्रोजनने भरलेल्या काचेच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले आहे.

कॅपुचिन कॅटाकॉम्ब्स पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. रोसालियाचे शरीर उल्लेखनीय स्वरुपात एक शतकानंतरही चांगल्याप्रकारे संरक्षित आहे. कॅपुचिन कॅटाकॉम्ब्समध्ये 8 हजार अन्य ममी आहेत, परंतु रोसानियाप्रमाणे कुठलीच ममी संरक्षित नाही.
सुरक्षात्मक काचेच्या पेटीत तिचे केस आणि त्वचा अद्याप पूर्णपणे पहिल्याप्रमाणे आहे. यावरून लोकांनी विविध प्रकारचे दावे केले आहेत. स्कॅन आणि एक्स-रेने रोसालियाच्या सापळय़ाची संरचना आणि अवयव 100 वर्षांनंतरही कायम असल्याची पुष्टी मिळाली आहे. केवळ तिचा मेंदू मूळ आकाराच्या 50 टक्क्यांनी आंकुचित पावला आहे. 2 वर्षीय मुलीला सिसिली टॅक्सिडर्मिस्ट आणि एम्बल्मर अल्पेडो सलाफिया यांनी ममीकृत केले होते. पूर्णपणे संरक्षित शरीराच्या रहस्यामुळे रोसालिया इटलीत संशोधनाचा विषय ठरली आहे.









