सूर्य, मंगळ अन् शुक्राला गवसणी घालण्याची योजना
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून प्रक्षेपित चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. ही मोहीम केवळ इस्रोसाठी नव्हे तर पूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. चांद्रयान-3 मोठी कामगिरी असली तरीही इस्रो आता नवे मैलाचे दगड गाठण्याच्या तयारीत आहे. इस्रोने आता सूर्य, मंगळ आणि शुक्रापर्यंत जाण्याची तयारी चालविली आहे.
गगनयान मोहीम
इस्रोची गगनयान मोहीम ही अंतराळात भारतीय पाठविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आहे. गगनयान मोहीम 2025 नंतर साकार होण्याची अपेक्षा आहे. सध्या गगनयान ह्यूमन स्पेस फ्लाइट मिशनपूर्वी इस्रोने दोन मानवरहित अंतराळ मोहिमांची योजना आखली आहे. इस्रो पुढील वर्षाच्या प्रारंभी पहिल्या मानवरहित फ्लाइटचे परीक्षण करणार आहे. या अंतराळयानाला व्योममित्र नाव देण्यात आले आहे. गगनयान प्रकल्पासाठी इस्रोने क्रायो स्टेज इंजिन क्वालिफिकेशन टेस्ट, क्रू एस्केप सिस्टीमसोबत पॅराशूट एअरड्रॉप टेस्ट पूर्ण केली आहे.
सूर्याचे अध्ययन करणार आदित्य एल-1

इस्रो सूर्याचे अध्ययन करण्याची तयारी करत आहे. याकरता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आदित्य एल-1 प्रक्षेपित केला जाऊ शकतो. अंतराळयान सूर्य-पृथ्वीच्या सिस्टीममध्ये लॅगरेंज पॉइंट-1 (एल1) नजीक तयार झालेल्या हैलो ऑर्बिटमध्ये पोहोचणार आहे. ही कक्षा पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. या यानाच्या मदतीने सूर्याचे सातत्याने अध्ययन करणे शक्य होणार आहे. ग्रहण आणि इतर खगोलीय घटनांमुळे या अध्ययनात अडथळे निर्माण होणार नाहीत. आदित्य एल-1 पीएसएलव्ही रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जाईल. अंतराळ यान पृथ्वीच्या कनिष्ट कक्षेत असेल आणि याला एल1 च्या दिशेने ढकलले जाणार आहे. प्रक्षेपणानंतर एल1 च्या दिशेने या यानाचा प्रवास चार महिन्यांचा असणार आहे.
अमेरिकेसोबत संयुक्त मोहीम-निसार

नासा आणि इस्रोची संयुक्त मोहीम निसार पृथ्वीच्या बदलल्या इकोसिस्टीमचे अध्ययन करणार आहे. भूजलाच्या प्रवाहासोबत ज्वालामुखी, ग्लेशियर वितळण्याचा दर, पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या बदलांचे अध्ययन केले जाणार आहे. निसार जगभरात पृष्ठभागावर होत असलेल्या बदलांवर नजर ठेवेल. निसार दर 12 दिवसांमध्ये डिफॉर्मेशन मॅप तयार करेल आणि यासाठी दोन फ्रिक्वेंसी बँड्सचा वापर करणार आहे. यामुळे भूकंपप्रवण भागांची ओळख पटविण्यास मदत मिळणार आहे. या मोहिमेसाठी सुमारे 1.5 अब्ज डॉलर्सचा खर्च येणार असून हा जगातील सर्वात महाग उपग्रह ठरणार आहे. 2800 किलोचा हा उपग्रह एल-बँड आणि एस-बँड सिंथेटिक अपर्चर रडार (एसएआर) उपकरणांद्वारे सुसज्ज असणार आहे.
पुन्हा मंगळ मोहीम

भारताची दुसरी आंतरग्रहीय मोहीम मंगळयान-2 प्रस्तावित आहे. यावेळी हायपर स्पेक्ट्रल कॅमेरा आणि रडार ऑर्बिटल प्रोबमध्ये असणार आहेत. भारताची पहिली मोहीम यशस्वी ठरली होती. लाँच व्हेईकल, अंतराळयान आणि ग्राउंड सेगमेंटसाठी 450 कोटी रुपयांचा खर्च आला होता.
स्पेडेक्स (स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट)

भारताला भविष्यात स्वत:चे अंतराळ स्थानक निर्माण करावे लागणार आहे. याकरता स्वदेशी स्पेडेक्स तयार केले जात आहे. याचे लक्ष्य पृथ्वीच्या कक्षेत दोन अंतराळयानांना डॉक (पार्क) करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे आहे. मल्टी मॉड्यूल स्पेस स्टेशन निर्माण करण्यासाठी हे आवश्यक असते.
शुक्र यानाचीही योजना

इस्रोने मंगळयान-1 च्या यशानंतर शुक्र ग्रहावर नजरा केंद्रीत केल्या आहेत. अमेरिका, युरोपीय अंतराळ संस्था आणि चीनने देखील शुक्र ग्रहासाठीच्या स्वत:च्या मोहिमेवर काम सुरू केले आहे. भारताची शुक्रमोहीम 2031 मध्ये पार पाडणार असल्याचे मानले जात आहे.
हवामान निरीक्षण उपग्रह

इस्रो लवकरच हवामान निरीक्षण उपग्रह-इनसॅट-3 डीएस प्रक्षेपित करणार आहे. इस्रोच्या अधिकाऱ्यांनुसार याची तयारी अंतिम स्वरुप घेत आहे. याचबरोबर आगामी महिन्यांमध्ये काही संरक्षण अन् पर्यावरणीय अध्ययनाचे उपग्रहही प्रक्षेपित केले जाणार आहेत.









