गोव्यातील हवामान सध्या विचित्र बनलेले आहे. राज्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण गोमंतकीयांना दिलासा लाभत असला तरी या पावसामुळे नुकसान सोसावे लागत आहे. विविध ठिकाणी झाडांची पडझड झाली असून त्याची झळ विद्युतवाहिन्यांनाही बसली. तसेच अनेक ठिकाणी वीजप्रवाह खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठ्यावरही परिणाम जाणवत आहे. एकंदरीत गोमंतकीयांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
एकीकडे गोवा राज्यात उत्सवांची मांदियाळी सुरू असून दुसरीकडे उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेले नागरिक थंडाव्यासाठी विविध ठिकाणी जलसिंचन खात्यातर्फे उभारलेल्या बंधाऱ्यांच्या पाण्यात आंघोळ करतानाचे चित्र दिसून येते. खासकरून रविवार व सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मोर्चा नदी किनाऱ्यांकडे वळलेला असतो. तसेच काही स्थानिक तसेच पर्यटकही उन्हाळा असह्या होत असल्याने आपले बस्तान समुद्रकिनाऱ्यांकडे वळवत आहेत.
विशेषत: सत्तरी तालुक्यातील केरी, मोर्ले भागातून वाहणाऱ्या वाळवंटी नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गोव्याच्या विविध भागांतील तरुणांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळते. गटागटाने येणारे यातील बरेच तरुण मद्यधुंद होऊन नदीच्या डोहात आंघोळ करताना दिसतात. हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे बाहेरील नागरिकांना आंघोळीला व सहलीसाठी येण्यास बंदी घालावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. यासंदर्भात सत्तरी उपजिल्हाधिकाऱ्यांसह केरी, मोर्ले ग्रामपंचायत तसेच वाळपई मामलेदारांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे. गोव्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. गढूळ पाण्याचा पुरवठा, वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या समस्येमुळे उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळेही गोमंतकीय नागरिक त्रस्त आहेत.
सध्या उकाडा वाढत असल्याने या ठिकाणी गोव्याच्या विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. युवकांचे गट दिवसभर नदीत आंघोळ करून मौज-मजा करतात. ते खाद्यपदार्थ घेऊन येतात. नदीकिनारी चूल पेटवून जेवण करतात आणि कचरा तसाच टाकून निघून जातात. त्यामुळे परिसर अस्वच्छ होत असून दुर्गंधी पसरते. काहीजण मद्यधुंद होऊन आंघोळीसाठी नदीपात्रात उतरतात. त्यामुळे दुर्घटना घडत आहेत. अलीकडेच अशाच प्रकारातून एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देऊन अशा प्रकारांवर प्रतिबंध आणावा, अशी मागणी होत आहे.
एप्रिल महिन्यात गोव्यात उष्णतेने कहर केला आहे. असह्या उकाड्याने अंगाची लाही-लाही होत आहे. गोमंतकीय नागरिक उन्हाळ्यात किमान एकदा समुद्रातील पाण्याने आंघोळ करतात व क्षारयुक्त हवा घेतात. ही फार प्राचीन परंपरा आहे. त्यामुळे गोमंतकीय कामातून सवड मिळताच समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आंघोळ करत आहेत. हे समुद्रस्नान आरोग्यदायी मानले जात असल्यामुळे प्रत्येक गोमंतकीय वर्षातून किमान एकदा समुद्रस्नान करतो. त्यामुळे पर्यटकांबरोबरच गोमंतकीयही जात असल्याने समुद्रकिनारे गजबजलेले दिसत आहेत.
गोव्यात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. याचे विपरित परिणाम राज्यातील काजू उत्पादनावर होत आहे. यामुळे गोवा राज्यातील काजू उत्पादकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होण्याची भीती असून सरकारने यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन काजू उत्पादकांना आर्थिक पाठबळ देण्याच्यादृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. आंबा उत्पादनही संकटात आले आहे. असंतुलित हवामानामुळे यंदा आंबा लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कैऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. यंदा मानकुराद आंब्याचे पीक कमी प्रमाणात आढळून येते.
गोव्याच्या सांस्कृतिक आणि कृषी वारशाचे प्रतीक असलेला ‘गोवा काजू महोत्सव 2025-सीझन-3’ पुन्हा एकदा रंगतदार ठरणार आहे. दि. 25, दि. 26 आणि दि. 27 एप्रिल रोजी कांपाल-पणजी येथील डी. बी. मैदानावर हा महोत्सव भव्य-दिव्य पद्धतीने साजरा होणार आहे. गोवा वनविकास महामंडळाच्या पुढाकाराने आणि अध्यक्ष डॉ. देविया विश्वजित राणे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात काजू लागवडीचे महत्त्व विशद होणार आहे. त्यापासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन होणार आहे. विशिष्ट चव, रंग आणि गुणवत्ता यामुळे गोवा काजू इतर काजूपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे त्याला ‘जीआय’ टॅग मिळाला आहे. ही गुणवत्ता कायम राहिली तर गोव्याच्या काजूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध होतील. स्थानिक काजू शेतकरी आणि उत्पादकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी नकली काजू विक्रेत्यांवर आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी अन्न आणि औषध प्रशासनालयामार्फत अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. यापुढेही यासंदर्भातील जनजागृती करण्यासाठी काजू महोत्सव महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मत डॉ. देविया राणे यांचे आहे.
गोवा काजू महोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही तर गोव्याच्या काजू संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराचे माध्यम आहे. यातून स्थानिक शेतकरी, कारागीर, स्वयंसाहाय्य गट यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून गोव्याच्या काजूला उच्च दर्जाचे स्थान मिळवून देण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न आहे.
काणकोणपासून पेडणेपर्यंत गोव्यात काजूचे पीक घेतले जाते. असंख्य शेतकऱ्यांचे काजू पीक हे महत्त्वाचे पीक असून वर्षभराची गुजराण याच पीकावर केली जाते. मात्र एप्रिल महिन्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात काजूचा मोहोर तसेच कोवळी काजू बोंडे गळून पडली आहेत. त्यामुळे यंदा काजू उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. उत्पादनात घट झाल्याचा फटका केवळ काजू उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे असे नाही तर गोव्यातील काजूगर विक्रेते, व्यापारी, फेणी, हुर्राक उत्पादकांवर देखील याचा परिणाम दिसून येणार आहे. आतापर्यंत जे उत्पादन आले आहे, ते पाहता सध्या 30 टक्क्यांनी घट झाली असल्याचे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. यंदा 162 रुपये प्रतिकिलो दराने काजू विक्री सुरू असून किमान 200 रुपये प्रतिकिलो भाव द्यावा, अशी मागणी होत आहे.
सध्या शेती लागवडीसाठी भयंकर खर्च वाढलेला आहे व सामान्य शेतकऱ्यांना तो परवडत नाही. त्यामुळे काही ठिकाणी शेतकरी शेती लागवडीसाठी पुढे येण्यास कचरत आहेत. त्यामुळे भविष्यात शेती लागवडीवर विपरित परिणाम होऊ शकतो. यासाठी सरकारने भाताच्या आधारभूत किंमतीत वाढ करणे, हा एकमेव उपाय ठरतो. दुसरीकडे रानटी श्वापदांकडून शेती-बागायती पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरीवर्ग त्रस्त आहे. त्यावरही सरकारने उपाययोजना आखणे अगत्याचे ठरते.
गोव्यात हरमलच्या मिरचीला चांगली पसंती आहे. याला ‘जीआय’ मानांकन प्राप्त झाल्यामुळे हरमल मिरची संघटना स्थापन करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी मिरची पीक वाढीसाठी या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक साहाय्य देणे आवश्यक ठरते. गोव्यात सध्या नारळ पिकाचा तुटवडा जाणवत असल्याने दर चढेच आहेत. नारळाच्या उपलब्धतेत झालेल्या तीव्र घसरणीची गंभीर दखल घेत शेतकरी आणि आदर्श कृषी सहकारी खरेदी विक्री प्रक्रिया संस्था मर्यादित, बाळ्ळी यांनी राज्य सरकारला नारळाच्या तुटवड्याचे अधिकृतपणे निवारण करावे आणि उत्पादकांसाठी ठोस आधार धोरण तयार करावे, अशी मागणी केली आहे.
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्येसंदर्भात गांभीर्याने विचार करून उत्पादकांना दिलासा देणे आवश्यक आहे. तरच गोव्यातील कृषी व्यवस्था योग्य रुळावर येऊन ‘स्वयंपूर्ण गोवा’ हे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होणार आहे. एकंदरीत, एप्रिल महिना अवकाळी पावसाने तसेच वाढत्या उकाड्याने गोंयकारांसाठी तापदायक ठरला आहे. आगामी दिवस कसे असतील, याबाबत गोमंतकीय विवंचनेत आहेत.
राजेश परब








