केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा, पोर्टलचा प्रारंभ, गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘सहारा’ या वित्तसंस्थेत ज्यांनी पैसे गुंतविले आहेत, ते त्यांना परत देण्याची व्यवस्था केंद्र सरकारने केली आहे. हे पैसे परत देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहारा रिफंड पोर्टलचा प्रारंभ केला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार आहेत. सहारा किंवा तिच्या सहकारी संस्थांमध्ये ज्यांचा पैसे अनेक वर्षांपासून अडकला आहे. त्यांच्या आशा आता जाग्या झाल्या आहेत. या पोर्टलचा लाभ प्रथम चार कोटी लोकांना होणार आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून 5 हजार कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत केले जातील. सहारा विरोधात कित्येक वर्षे न्यायालयात प्रकरण चालले. केंद्र सरकारच्या अनेक तपास आणि अन्वेषण यंत्रणांनी सहाराच्या कित्येक उपकंपन्यांवर आणि सहकारी कंपन्यांवर धाडी घातल्या. सहाराची काही संपत्ती जप्त करण्यात आली. आता केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. या पोर्टलचा लाभ घ्यावा असे आवाहन अमित शहा यांनी केले. सहारा कंपनीची माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे.
मॅच्युरीटी पूर्ण झालेल्यांना…
सहारातील ज्या गुंतवणूदारांनी मॅच्युरिटी पूर्ण झाली आहे, त्यांना रक्कम परत मिळणार आहे. या पोर्टलवर त्यासाठी गुंतवणूकदार आपले नाव नोंदवू शकतात. गुंतवणूकदारांच्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर त्यांना पैसा परत दिला जाईल. नाव नोंदणी केल्यापासून साधारणत: 30 दिवसांमध्ये पडताळणी पूर्ण करण्याची योजना आहे. त्यानंतर पुढच्या 15 दिवसांमध्ये ऑनलाईन क्लेम केल्यानंतर पैसे परत मिळणार आहेत. क्लेम मान्य झाल्यानंतर गुंतवणूकदाराला तशी सूचना केली जाईल. नंतर त्याच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाईल.
सहकार विभागाची सज्जता
सहाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यानुसार पैसे परत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सहारायन युनिव्हर्सल मल्टिपर्पझ सोसायटी, हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि स्टार्स मल्टिपर्पझ को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय सहकार विभागाने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 5 हजार कोटी परत देण्याचा निर्णय दिला.









