विवाह सोहळ्यात नव्या प्रथा, अक्षतासाठी निमंत्रक ताटकळत
कोल्हापूर /सुधाकर काशीद
लग्नाचा मुहूर्त बारा वाजून दहा मिनिटांचा. पाहुणे नातेवाईक उन्हातून धावपळ करत विवाह स्थळी पोहोचलेत. लग्नाचा हॉल गच्च भरला आहे. उकडून उकडून सर्वांच्या अंगातून घामाच्या धारा वाहु लागल्या आहेत. मुहूर्ताची वेळ झाली. पण मंचकावर नवरा नवरीचा पत्ता नाही. मंगल कार्यालयापासून काही अंतरावर बेंजो चा दणदणाट सुरू आहे. म्हणजे आता काही वेळातच नवरा नवरी हॉलमध्ये येतील असाच प्रत्येकाचा अंदाज आहे. पण बँजो चा दणदणाट वाढतच आहे. पाच-पन्नास जण त्या तालावर नाचत आहेत. मागे घोड्यावर नवरा मुलगा आहे. डोलीत नवरी मुलगी आहे. नवरा मुलगाही घोड्यावर बसलेल्या अवस्थेतच अधून मधून आपला आपले हात हलवून आपल्यातील उत्साह दाखवत आहे. पण मुहूर्ताची वेळ टळून चाळीस मिनिटे झाली तरी ते मिरवणुकीतच आहेत. इकडे पाहुणे कंटाळले आहेत. रागाने फणफणत आहेत. हातातल्या अक्षता घामाने भिजल्या आहेत. पण सर्वांचाच नाईलाज आहे. कारण मुहूर्तावर लग्न हा प्रकारच कोल्हापुरात जवळजवळ नाहीसा झाला आहे.
लग्न हा एक पवित्र बंधन सोहळा. त्याला इव्हेंटचे स्वरूप आल्यामुळे लग्न सोहळ्याचा सारा बाजच बदलला आहे. लग्न पत्रिकेतील मुहूर्त केवळ नावालाच उरला आहे. त्या ऐवजी अगोदर घरातल्या घरात वधूवरावर अक्षता टाकून विवाह उरकला जात आहे. व निमंत्रितासाठी असलेल्या मंगल कार्यालयातील विवाहासाठी नवरा नवरी वाजत गाजत नाचत किमान तासभर उशिरा येत आहेत. जरूर लग्नात हौस, गंमत ,आनंद गरजेचा आहे. पण पाहुण्यांना मित्र परिवाराला लग्नासाठी बारा वाजता आमंत्रित करायचे. पण प्रत्यक्षात लग्न तासभर उशिरा लावायचे अशा प्रकारामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आतापर्यंत लोक कशाला आपण बोलून वाईटपणा घ्यायचा म्हणून बोलत नव्हते. पण आता या संतापाला तोंड फुटले आहे. माजी नगरसेवक विजय सरदार यांनी लग्नाच्या अशा प्रकाराबद्दल तर जाहीर निषेधाचा पवित्र घेतला आहे. ज्यांना लग्नात हौस मजा करायची आहे ,मनसोक्त नाचायचे आहे त्यांनी जरूर नाचावे. पण पाहुण्यांना ज्यावेळी निमंत्रित केले आहे त्याच वेळी विवाह सोहळा व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. समाजातील जेष्ठ नागरिकांनी, दोन्ही बाजूच्या जबाबदार नातेवाईकांनी यात लक्ष घालावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पहिल्यांदा घरगुती स्वरूपात लग्न व नंतर मंगल कार्यालयात लग्न अशा दोन प्रकारे लग्न करण्याची एक विचित्र प्रथा पडली आहे. गेली वर्ष दोन वर्ष हा प्रकार वाढला आहे. पण त्याचे प्रमाण तुलनेने कमी होते. अलीकडे हा मात्र प्रकार खूप वाढला आहे. अर्थात नवरा नवरीकडील सर्वांनाच हा प्रकार मान्य नसतो. पण दोन्ही बाजूच्या काही उत्साहींनी मात्र लग्नाचा पारंपारिक बाज हरवून टाकला आहे. ते आपल्या हौसेसाठी मुहूर्ताच्या अगोदर सोयीचा मुहूर्त काढून नवरा नवरीवर अक्षता टाकुन घेतात व त्यानंतर शिस्तीत, नाचत, वाजत ,गाजत मंगल कार्यालयात येतात. तोवर सारे निमंत्रण ताटकळत बसतात. दुपारची वेळ भुकेची असल्याने संतापून जातात. पण सर्वांचा नाईलाज असतो. लग्नातला काही जणांचा नको इतका उत्साह निमूटपणे पहावा लागतो. या प्रकाराबद्दल लोकात तीव्र प्रतिक्रिया होतीच. पण आता त्याला तोंड फुटले आहे. विवाह सोहळा दिलेल्या वेळेत करणार असाल तरच पाहुण्यांना बोलवा. तुमच्या हौसेसाठी इतरांचा वेळ वाया घालवू नका, अशी उघड भावना त्यामुळे व्यक्त होऊ लागली आहे.
वेळ पाळा…
विवाहाची वेळ जी निमंत्रण पत्रिकेत आहे तीच पाळली गेली पाहिजे. आम्ही लग्नाला येतो. नवरा नवरीची मिरवणूक व त्यांच्या समोरचा डान्स पाहायला येत नाही. लग्नात जरूर नाचा, आनंद घ्या. पण निमंत्रितांचा वेळ वाया घालवू नका एवढीच आमची अपेक्षा आहे.
विजय सरदार
माजी नगरसेवक
इतरांना कामे असतात…
प्रत्येक पाहुण्याला, निमंत्रिताला पुढची कामे असतात. पण अलीकडे लग्न ठरलेल्या मुहूर्तावर होतच नाही. त्यामुळे मंगल कार्यालयात ताटकळत बसावे लागते. आनंदा ऐवजी प्रत्येकाच्या मनात संतापाची भावना निर्माण होते. त्यामुळे लग्न सोहळे ठरलेल्या वेळेतच व्हावेत.
श्रीकांत कदम.









