कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँगेसच्या एका आमदारावर सीबीआयची धाड पडल्यानंतर त्याने आपले मोबाईल तलावात फेकल्याची घटना घडली आहे. या आमदाराचे नाव कृष्णा साहा असे आहे. तो कोटय़वधी रुपयांच्या शिक्षकभरती घोटाळय़ातील एक आरोपी आहे. आता सीबीआयने पंप लावून तलाव रिकामा करण्याचे काम सुरु केले असून मोबाईल्सचा शोध चालविला आहे. सीबीआयने शुक्रवारी दुपारी 1 वाजता त्याच्या घरावर धाड टाकली. त्याने वॉशरुमला जाण्याचा बहाणा करत घराच्या बाहेर पळ काढला. सीबीआय अधिकाऱयांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी त्याला पकडले. मात्र, त्या आधी त्याने आपले दोन मोबाईल्स घराशेजारच्या तलावात फेकल्याचे दिसून आले. नंतर सीबीआय अधिकाऱयांनी फोन शोधण्याचा प्रयत्न केला. तो करत असताना त्यांना तलावात सहा बॅगा सापडल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. फोन शोधण्यासाठी आता चार पंप लावण्यात आले असून तलाव रिकामा करण्यात येत आहे.









