दिव्यांग व्यक्तीची सर्टिफिकेटसाठी ‘अशी ही बनवाबनवी’
बेळगाव : पोलीस अधिकारी असल्याचे सांगून मेडिकल सर्टिफिकेटसाठी सरकारी डॉक्टरवर दबाव आणणाऱ्या एका युवकाला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. तो दिव्यांग असून हॉस्पिटलबाहेरून स्वत:च डॉक्टरना कॉल करून वरिष्ठ पोलीस अधिकारी बोलत असल्याची बतावणी त्या डॉक्टरना करायचा. अप्पु बसय्या हिरेमठ, रा. जमखंडी रोड, हारुगेरी असे त्याचे नाव आहे. भादंवि 419, 420 कलमान्वये त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक रमेश आवजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. 18 व 19 मे रोजी दोन दिवस अप्पु दिव्यांग सर्टिफिकेटसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचला होता. तेथे पोहोचण्याआधी तेथील डॉक्टरांचे मोबाईल क्रमांक मिळवून ‘आपण बेंगळूरचे अॅडिशनल एसपी बोलतो, आमचा एक दिव्यांग मुलगा येईल, त्याला त्वरित सर्टिफिकेट द्या’ असे फर्मान सोडले. इतक्यावरच तो थांबला नाही तर एपीएमसी पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनाही बेंगळूरचे अॅडिशनल एसपी म्हणून कॉल केला.
‘आपल्या परिचयाचा एक दिव्यांग युवक सिव्हिलला जातो. तुम्ही तेथील डॉक्टरांना सांगून त्वरित त्याला सर्टिफिकेट मिळेल अशी व्यवस्था करा’, असे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. प्रत्यक्षात सर्टिफिकेटसाठी तो तिथे स्वत:च पोहोचला. बेंगळूरच्या अॅडिशनल एसपींनी आपल्याला येथे पाठविले आहे, अशी ओळख करून दिली. पोलीस, डॉक्टर कामाला लागले. एक तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची शिफारस केली आहे. दुसरे तो दिव्यांग आहे. त्याला मदत होऊ देत, या भावनेने विनाविलंब सर्टिफिकेट तयार झाले. त्यावेळी त्याची शिफारस करणाऱ्या अॅडिशनल एसपींना कॉल केला. त्यावेळी अप्पु डॉक्टरांच्या समोरच बसला होता. त्याच्या खिशातील मोबाईल वाजला. त्यामुळे शिफारशीसाठी आलेला क्रमांक पोलीस अधिकाऱ्याचा नसून तो स्वत: अप्पुचाच आहे, हे डॉक्टरांच्या लक्षात आले. बिम्समधील असिस्टंट प्रोफेसर डॉ. अशोक संपगार यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यावरून अप्पुला अटक करण्यात आली आहे. जमखंडी, हारुगेरी व नवलगुंद येथूनही वेगवेगळ्या नावाने त्या युवकाने सर्टिफिकेट मिळविली आहेत. तेथेही अशीच शक्कल लढविली असून त्याची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी समाजकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना पत्रे पाठविली आहेत. त्याने कोणकोणत्या ठिकाणाहून सर्टिफिकेट मिळविली आहेत, याची चौकशी करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षकांची तत्परता
विधानसभा निवडणुकीच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यावेळी विजापूरहून एपीएमसी पोलीस स्थानकात रुजू झालेले रमेश आवजी यांनी अनेक प्रकरणांचा छडा लावला आहे. निवडणुकीसाठी बेळगावला बदली होऊन आलेले अनेक अधिकारी जणू एक-दोन महिन्यांच्या सहलीवर आल्याच्या थाटात वागत आहेत. रमेश यांनी मात्र याला छेद देताना उत्तर प्रदेशमधील अट्टल घरफोड्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्याबरोबरच अनेक गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावला आहे.









