खानापूर भाजप पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती : मागासवर्गीय खात्याच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार दाखल करणार
खानापूर : आमदार विठ्ठल हलगेकर यांचे संपर्क कार्यालय देवराज अर्स भवनातील सभागृहात नुकतेच सुरवात केले होते. मागासवर्गीय समाज कल्याण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयावर आक्षेत घेत कार्यालय बंद करण्याचे आदेश शनिवारी दुपारी दिले. त्याप्रमाणे तालुका मागासवर्गीय खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या विरोधात खानापूर तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईचा निषेध करत आमदारांच्या झालेल्या अपमानाच्या विरोधात कर्नाटक विधान सभा सभापतीकडे मागासवर्गीय खात्याच्या या मनमानी कारभाराविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन येथील देवराज अर्स भवनातील मगासवर्गीय कल्याण खात्याच्या इमारतीत दि. 17 रोजी केले होते. या विरोधात दि. 18 रोजी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यालयावर आक्षेप घेत तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत दि. 19 रोजी जिल्हा मागासवर्गीय कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आदेश देत हे कार्यालय बंद करावे, तसेच तालुका अधिकाऱ्यांनी हे कार्यालय आपल्या ताब्यात घ्यावे, असे आदेश दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी तालुका अधिकाऱ्यांनी शनिवारी केली. त्यामुळे आमदारांचे कार्यालय बंद करण्यात आले. याबाबत भाजपने तीव्र शब्दात निषेध करत रविवारी पत्रकार परिषद घेऊन मागासवर्गीय खात्याच्या तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरीय अधिकाऱ्यांविरोधात सभापतींकडे हक्कभंग प्रस्तावाद्वारे दाद मागणार असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी सांगितले.
काँग्रेसचे घाणेरडे राजकारण
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, आम्ही 20 जुलै रोजी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या संपर्क कार्यालयासाठी रितसर अर्ज केला. त्यावेळी तालुका मागासवर्गीय खात्याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला तोंडी परवानगी दिली. त्यामुळे आम्ही कार्यालयासाठी लागणारे फर्निचर आणि इतर साहित्य आणून कार्यालयाचे सुशोभिकरण केले आहे. त्यावेळी मात्र कोणीही आक्षेप घेतला नाही. रितसर कार्यालयाचे उद्घाटन केल्यावर काँग्रेसने घाणेरडे राजकारण करत या विरोधात अर्ज दिला आहे. आम्ही परवानगीसाठी अर्ज देऊन महिना झाला तरी परवानगी दिली नाही. मात्र तक्रार अर्ज दिलेल्या अवघ्या काही तासात कारवाई केली. हे कशाचे द्योतक आहे. परवानगी नाकारली असती तर आम्ही कार्यालय केलेच नसते. मात्र तेंडी परवानगी दिल्यानंतरच कार्यालय सुरू केले आहे. अधिकाऱ्यांनी समस्त खानापूर तालुक्याच्या जनतेचा अपमान केला आहे. यावेळी भाजप अध्यक्ष संजय कुबल म्हणाले, काँग्रेसने घाणेरडे राजकारण सोडून विकासाच्या दृष्टीने काही प्रयत्न करावेत, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. त्या माध्यमातून माजी आमदार आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील समस्येबाबत सरकारकडून काही तरी उपाययोजना करावी, विकासाच्या बाबतीत आम्हास सहकार्य करावे. माजी जि. पं. सदस्य जोतिबा रेमाणी म्हणाले, आमदार कार्यालय हे तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी केले होते. या ठिकाणी गोरगरीब जनतेला त्यांच्या समस्या, त्यांच्यावर झालेल्या अन्याय निवारणासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. असे असताना काँग्रेसने राजकारण करून हे कार्यालय बंद पाडले आहे. यावेळी सदानंद पाटील, पंडित ओगलेसह अनेकांनी या घटनेचा निषेध केला. यावेळी मल्लाप्पा मारिहाळ, राजेंद्र रायका, जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, रमेश नार्वेकरसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









