कर्मचारी क्रीडा स्पर्धेत गुंतल्याने संताप : महिलावर्गाला सर्वाधिक फटका
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील जन्म-मृत्यू विभागाचा सावळा गोंधळ काही केल्या संपताना दिसत नाही. शनिवारी विभागातील कर्मचारी क्रीडा स्पर्धांमध्ये गुंतल्याने जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आलेल्या नागरिकांना वाट पहावी लागली. कर्मचारी नसतील तर त्याची माहिती देणे गरजेचे होते, परंतु तसे न झाल्याने दूरवरून आलेल्या नागरिकांना पुन्हा माघारी फिरावे लागले. शाळांमध्ये सुरू असलेल्या अपार नोंदणीमुळे जन्म दाखल्यातील चूक दुरुस्तीसाठी पालकांची गर्दी होत आहे. परंतु कर्मचारी मोजकेच असल्याने एका दुरुस्तीसाठी दोन ते तीन दिवस पळापळ करावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत होती. परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आहे त्याच कर्मचाऱ्यांवर नेंदणीचे काम करण्यात येत आहे. शनिवारी क्रीडास्पर्धा असल्याने मनपाचे अनेक कर्मचारी कार्यालयात नव्हते. जन्म-मृत्यू विभाग तर पूर्णपणे बंद होता. याची माहिती नागरिकांना नसल्याने अनेकजण कार्यालयात येऊन पुन्हा घरी गेले. महिलावर्गाला याचा सर्वाधिक फटका बसला. कार्यालय सुरू होईल या विचाराने अनेकजण वाट पाहत बसले होते. परंतु कर्मचारी न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.









