दोन नरांद्वारे जन्मला उंदिर : विज्ञानाने मोडीत काढला निसर्गाचा नियम
विज्ञानाने यावेळी निसर्गाच्या मर्यादांना थेट आव्हान दिले आहे. चीनच्या जियाओतोंग विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी एक असा उंदीर तयार केला, जो केवळ दोन नर उंदरांद्वारे जन्माला आला आहे. केवळ दोन शुक्राणूंच्या मदतीने हा जन्म शक्य झाला आहे. हा प्रयोग यशस्वी राहण्यास यातून जन्मलेला उंदीर तंदुरुस्त आणि प्रजननातही सक्षम आहे. म्हणजेच पुढील काळात तोही पिल्लांना जन्म देऊ शकतो. यासंबंधीचे अध्ययन प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. या यशामुळे जेनेटिक्स आणि रिप्रॉडक्टिव्ह बायोलॉजीच्या क्षेत्रात एक नव्या क्रांतिची सुरुवात झाली आहे.
या प्रयोगात वैज्ञानिकांनी एपिजेनेटिक प्रोग्रामिंग म्हणजेच मिथाइलेशन पॅटर्नला एडिट करत नवी पद्धत अवलंबिली. मिथाइलेशन या प्रक्रियेत डीएनएच्या अॅक्टिव्हिटीला नियंत्रित केले जाते, परंतु याचा डीएनए सीक्वेंसवर कुठलाच प्रभाव पडत नाही. दोन वेगवेगळ्या नर उंदरांच्या शुक्राणूंचा वापर करण्यात आला. यात एक लॅब-ब्dरोड माउस तर दुसरा थायलंडच्या वाइल्ड माउसच्या प्रजातीतील होता. दोन्ही डीएनए स्रोत नरांचे असलेला भ्रूण तयार करण्यात आला.
या भ्रूणाला मादी उंदरात प्रत्यारोपित करण्यात आले आणि यातून तीन जिवंत पिल्लं जन्माला आली. याती एक आकारात असामान्य स्वरुपात मोठा असल्याने जन्माच्या दुसऱ्या दिवशी मृत्युमुखी पडला. परंतु दोन उंदीर स्वस्थ होते आणि यातील एक प्रजननातही सक्षम निघाला.
20 वर्षांचे संशोधन
यापूर्वी 2004 मध्ये जपानमध्ये दोन मादी उंदरांद्वारे पिल्लांचा जन्म झाला होता, ज्याला कगुया नाव देण्यात आले होते. 2018 मध्ये एका प्रयोगात दोन नर उंदरांच्या जीनला मिळून एक भ्रूण तयार करण्यात आला होता, परंतु जन्माच्या दुसऱ्याच दिवशी उंदराचा मृत्यू झाला होता. याचदरम्यान चिनी वैज्ञानिकांनी जीन डिलिशनच्या ऐवजी मिथाइलेशनद्वारे एपिजेनेटिक रीप्रोग्रामिंग केले, यामुळे भ्रूण स्वस्थ राहिला आणि त्याची जीवनक्षमताही चांगली राहिली.









