सांगली / विनायक जाधव :
आगामी सहा ते आठ महिन्यात निवडणुकाचा मोठा बाजार भरणार आहे. या निवडणुका सामान्य नागरिकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. कारण सत्तेची फळे कार्यकर्त्यांना या निवडणुकीतून मिळणार आहेत. महा-पालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि काही ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. या निवडणुका नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या ठरणार आहेत. बळ देणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसची अवस्था मात्र दयनीय आहे. काँग्रेसला अच्छे दिन येणार की पाय आणखीन खोलात जाणार हे समजणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेसची हालत पाहून कार्यकर्त्यांची मानसिकता ढासळली आहे हेही तितकेच खरे आहे.
जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला स्वप्नवत सांगली जिल्हा हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बालो ‘केल्ला होता. याठिकाणी विरोधकांना उभे राहण्याची साधी संधी नव्हती. सामान्य कार्यकर्त्यांनाही कॉंग्रेस आपली आई वाटत होती. त्या कार्यकर्त्यांलाही न्याय देण्याची भूमिका काँग्रेसच्या नेत्यांची होती. पण काळ बदलला… वेळ बदलली… आणि या बालेकिल्ल्याचे एक-एक बुरूज ढासळू लागले. याठिकाणी काँग्रेसचा बालेकिल्ला होता हेच म- की आगामी पिढीला समजणार नाही इतकी वाईट अवस्था झाली आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे कॉंग्रेसचे नेते आहेत. गट-तट आणि एकमेकां-ना जिरवण्याच्या नादात हे सर्वकाही घडले. हे मान्य करण्याची धमक कॉंग्रेस नेत्यांमध्ये नाही. पण सामान्य कार्यकर्ते आपली चूक मान्य करत आहेत हे खरे कौतुक आहे.
काँग्रेसला एकत्र आणणारे आहेत कोठे जिल्हा काँग्रेसला एकत्रित आणणारे नेते आणि सामान्य कार्यकर्त्याला सत्तेविरूध्द लढण्याचा नारा देणारे नेतृत्व सध्या आहे कोठे असा प्रश्न आहे. जिल्ह्यातील काँग्रेस अद्यापही गटा-तटातच अडकून पडली आहे. माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यातील काँग्रेसला एकत्रित करण्याची किमया तीन वर्षापुर्वी चांगल्या पध्दतीने केली होती. यामध्ये सर्व कॉंग्रेसची चांगली मोट बांधली होती. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या आणि ही मोट पुन्हा तुटली. सामान्य कार्यकर्ते सैरभैर झाले. एकटे विश्वजीत ज्यावेळी एकत्रिकरणाची प्रक्रिया पार पाडत होते. त्यावेळी इतर नेत्यांनी फक्त स्वतःचा लाभ बघितल. लोक सभा निवडणुकीवेळी विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीपासून दिल्लीपर्यंत धडक मारत दिल्लीलाही सांगलीच हवा दाखवून दिली. अपक्ष निवडून आल्यावर काय केले…!
विशाल पाटील यांनी अपक्ष निवडून आल्यावर कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यपद घेतले. यानंतर त्यांनी जाहीर भाषणातून अशी वक्तव्ये केली की, त्यांच्याबद्दलची विश्वासार्हताच अडचणीत आली. मंत्री जयकुमार गोरे यांच्या एका मिरजेच्या कार्यक्रमात त्यांनी भाजपामध्ये असतो तर मंत्री असतो हे विधान केले. यामुळे ते पक्ष सोडणार अशा चर्चांना उधाण आले. त्यांच्याबद्दलचे मत आणखीनच वाईट झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे आमंत्रण दिले. या आमंत्रणाला त्यांनी हसून टाळले. पण ते कधीही भाजपामध्ये जातील असे यातून प्रतित झाले. विधानसभेच्या निवडणुकीला त्यांनी जाहीरपणे काँग्रेसच्या विरोधात बंडखोर उमेदवार श्रीमती जयश्रीवहिनी यांचा प्रचार केला. त्यांचे काँग्रेसवर असणारे बेगडी प्रेम दिसून आले. ते काँग्रेसबरोबर असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते मान्य करत नाहीत.
पृथ्वीराज पाटील यांची डिनर डिप्लोमसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी त्यांचा पराभव झाल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांबरोबर जवळीक वाढविली. या दोन्ही पक्षाचे नेते त्यांच्या निवासस्थानी येवून जेवण करून जात आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे की पृथ्वीराज पाटील तरी काँग्रेसबरोबर आहेत का? भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर, सांगोल्याचे आमदार देशमुख, शिवसे-नेचे नेते आणि मंत्री शंभूराजे देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे त्यांच्या घरी जेवण करून गेले आहेत. त्यांच्या महाविद्यालयातही विविध कार्यक्रमासाठी गेले आहेत. याबाबत पृथ्वीराज पाटील यांनी कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. त्यांच्याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू आहे.
- जयश्रीवहिनींच्या कार्यकर्त्यांत फुट
मदनभाऊ गटाचे अनेक नेते आणि पदाधिकारी हे श्रीमती जयश्रीवहिनीच्या बरोबरीने भाजपामध्ये गेले आहेत. तर अनेकांना हा पक्षप्रवेश आवडला नाही यामध्ये बहुसंख्य मुस्लिम आणि इतर समाजाचे नेते आहेत. हे जयश्रीवहिनींकडे असणारे कार्यकर्ते काँग्रेसचे काम करणार की शांत बसणार हे आगामी काळात दिसून येईल.
- विश्वजीतच ठरवणार काँग्रेसचे अस्तित्व
माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी सांगली महापालिका क्षेत्रात दुभंगलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी वन टू वन संपर्क साधला आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच त्यांना ताकत दिली तर काँग्रेस निश्चितपणे पुन्हा उभारी घेवू शकते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सारे काही सुरळीत होवू शकते पण हे करण्यासाठी विश्वजीत कदम यांना वेळ द्यावा लागेल हेही तितकेच खरे आहे. ते कितपत वेळ देणार यावरूनच काँग्रेसचे अस्तित्व काय असणार हे ठरणार आहे.








