भोपाळ, ग्वाल्हेर, जबलपूरमध्ये छापेमारी
वृत्तसंस्था/ भोपाळ
‘आरटीओ’ परिवहन विभागाचा माजी हवालदार सौरभ शर्मा यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. भोपाळ जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. सौरभने गुरुवार, 26 डिसेंबर रोजी आपले वकील राकेश पराशर यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने ‘लक्षाधीश’ सौरभ शर्माच्या घरावर आणि इतर मालमत्तांवर छापे टाकले आहेत. ईडीचे पथक सकाळी सौरभच्या भोपाळ आणि ग्वाल्हेरमधील घर आणि कार्यालयात पोहोचले. लोकायुक्त आणि आयकर विभागानंतर आता ईडीही या प्रकरणाची चौकशी करत आहे. ईडीने सौरभविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.
ईडी अधिकारी सौरभ शर्माच्या भोपाळमधील तीन मालमत्तांपर्यंत पोहोचली आहे. ईडीने अरेरा कॉलनीतील जयपूरिया शाळेच्या कार्यालयावर छापा टाकला. तसेच अरेरा कॉलनीतील घरावरही छापा टाकला आहे. सौरभ शर्माचे हे दुसरे घर आहे. येथे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यासोबतच ईडीची टीम सौरभ शर्माच्या जबलपूरमधील मेहुण्याच्या घरी आणि ग्वाल्हेरमधील सौरभ शर्माच्या घरी पोहोचली आहे.
लोकायुक्तांकडूनही तपासणी
यापूर्वी 19 डिसेंबर रोजी लोकायुक्त पोलिसांनी माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्मा याच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला होता. यावेळी 2.95 कोटी रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने आणि मालमत्तेची अनेक कागदपत्रे सापडली होती. त्याच रात्री भोपाळच्या मेंदोरी जंगलात एका कारमध्ये 52 किलो सोने आणि 11 कोटी रुपयांची रोकड सापडली. ही कार सौरभचा मित्र चेतन सिंगची होती. यानंतर जप्त केलेले सोने आणि रोख रकमेची लिंक सौरभ शर्मापर्यंत पोहोचली होती. एकंदर सौरभची मालमत्ता लक्षावधी रुपयांच्या घरात असल्याने तो सर्वच तपास यंत्रणांच्या निशाण्यावर असल्याचे दिसत आहे.









