‘सिंदूर’ अभियानाया संदर्भात पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर खोचक टीका, पाकिस्तानलाही संदेश
वृत्तसंस्था / गांधीनगर
‘सिंदूर’ अभियानामुळे पाकिस्तानची किती आणि कोणती हानी झाली, याची छायाचित्रेच आता जगासमोर आल्याने काँग्रेसची पुरावा मागण्याची संधी हुकली आहे, अशी खोचक टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांनी पाकिस्तानलाही कठोर संदेश दिला असून भविष्यात कधीही भारताला त्रास देण्याचा विचारही मनात आणू नका, असे स्पष्ट शब्दांमध्ये ठणकावले आहे.
त्यांनी मंगळवारी येथे प्रथमच सिंदूर अभियानासंदर्भात राजकीय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पूर्वी उरी आणि पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक आणि वायुहल्ला करुन पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले होते. मात्र, त्यावेळी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या प्रतिहल्ल्याचे पुरावे मागून मोठा वाद निर्माण केला होता. यावेळी मात्र, भारताच्या सैन्यदलांनीच प्रत्यक्ष पुरावे सादर केल्याने विरोधकांची कोंडी झाली. त्यांची पुरावे विचारण्याची संधीच नाहीशी झाली, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे एका कार्यक्रमात लगावला आहे.
काँग्रेसचा पुन्हा सेल्फ गोल
काँग्रेसने यावेळी आपल्या तंत्रात परिवर्तन केले आहे. आमचा सैन्यदलांच्या पराक्रमावर पूर्ण विश्वास आहे, असे प्रतिपादन या पक्षाकडून करण्यात आले आहे. मात्र, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मात्र सिंदूर अभियानासंदर्भात शरसंधान चालूच ठेवले आहेत. ते नाटक कंपनी चालवेत आहेत. ते सिंदूर अभियानाचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका या पक्षाने केली. तथापि, अशी टीका करुन काँग्रेसने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. असा टोला भारतीय जनता पक्षाने लगावला आहे. सिंदूर अभियान आपल्या सैन्यदलांनी यशस्वी करुन दाखविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकविण्याचे धोरण निर्धारित केले आहे. त्यामुळे त्यांनी सैन्यदलांना पाकिस्तानवरील कार्यवाहीचे पूर्ण अधिकार दिले होते. त्यांच्या निर्णयाचाही सिंहाचा वाटा पाकिस्तानला बसलेल्या दणक्यात आहे. असा धाडसी आणि समयोचित निर्णय घेतल्याने सैन्यदलांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली आहे. काँग्रेसने मात्र, त्यांच्यावर शेलकी टीका करुन स्वत:चेच हसे करुन घेतले. हा काँग्रेसचा सेल्फ गोल असल्याची टीका भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे.
पाकिस्तानलाही कठोर संदेश
गुजरातची राजधानी गांधीनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानलाही कठोर संदेश दिला आहे. भारताने नेहमीच शांतता आणि स्थैर्य यांचा पुरस्कार केला आहे. मात्र पाकिस्तान हिंसाचार घडवत असल्याने त्याला प्रत्युत्तर देणे हे आमचे कर्तव्य आहे. पाकिस्तानने दहशतवाद हा आता आपल्या युद्धतंत्राचा एक भाग बनविला आहे. त्यामुळे आता त्या देशाकडून होणारा दहशतवाद केवळ छद्मयुद्ध किंवा प्रॉक्झी वॉर या स्वरुपाचा राहिलेला नाही. दहशतवाद म्हणजे युद्धच, असे त्याचे स्वरुप बनलेले आहे. त्यामुळे आम्ही दहशतवादाला युद्धासारखेच प्रत्युत्तर देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
दहशतवादाशी पाक लष्कराचा संबंध
भारताने पाकिस्तानात हल्ला करुन अनेक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. अनेक महत्वाच्या दहशतवाद्यांना अंत्यसंस्कार प्रसंगी पाकिस्तानचे ज्येष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. दहशतवाद्यांच्या शवपेट्यांवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पांघरलेला होता. यातून पाकिस्तानी लष्कराचा दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांशी असणारा संबंध स्पष्ट झाला. याच बाबीकडे आम्ही अनेक दशकांपासून जगाचे लक्ष्य वेधले आहे. आता पाकिस्ताननेच आमचे म्हणणे सिद्ध केल्याने तो देश जगासमोर उघडा पडला, अशीही टिप्पणी त्यांनी काय कार्यक्रमात केली आहे.









