जेटीही वाहून जाण्याच्या स्थितीत, जमीनही होत आहे गिळंकृत
आचरा प्रतिनिधी
सततचा पडणारा पाऊस आणि समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याने त्याचा फटका मधली तोंडवळीला बसला आहे. मधली तोंडवळी किनारी बंधारा नसलेल्या भागात मोठया प्रमाणात धूप होऊन समुद्राने भूभाग गिळंकृत केला आहे. गेल्या दोन दिवसांच्या उधाणामुळे बाळा पेडणेकर यांचे घर ते विलास झाड यांचे घर या भागात बंधारा नसल्याने धूप होत आहे. याच भागात दोन वर्षांपूर्वी गणेश पाटील यांचे रिसॉर्ट जवळ बांधण्यात आलेली जेटीचा पाया उध्वस्त झाला असून जेटी वाहून जाण्याच्या मार्गावर आहे.
उधाणाचा जोर कायम राहिल्यास धोका वाढणार
येणाऱ्या पौर्णिमे पर्यंत उधाणाचा जोर अजून वाढणार आहे त्यामुळे समुद्राचे पाणीही वस्तीच्या दिशेन मार्गक्रमण करत आहे. उधाणाचा जोर कायम राहिल्यास मोठी धूप होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली. उधाणाचा धोका लक्षात घेऊन तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, माजी सरपंच आबा कांदाळकर, शेखर तोंडवळकर, गणेश पाटील नाना पाटील, ग्रामसेवक विधी चव्हाण हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
ग्रामस्थ अजूनही संरक्षक बांधाऱ्याच्या प्रतीक्षेत
मधली तोंडवळी येथे वेगाने येणाऱ्या उधाणाच्या लाटांच्या माऱ्यामुळे किनाऱ्यालगतच असलेली सुरूची झाडे, माडबागायत नष्ट होत आहे पतन विभागाने बांधलेली जेटीही वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. स्थानिक ग्रामस्थ गणेश पाटील यांनी आपली जमीन वाचवण्यासाठी आपल्या भागातील होणारी धूप थांबवण्यासाठी ओंढके दगड टाकून धूप थांबणायचे प्रयत्नही केलेत परंतू उधाणाच्या तीव्रतेपुढे केलेल्या उपाय योजना निष्फळ ठरत आहेत. या भागासाठी संरक्षक बंधारा मंजूर असल्याचे सांगण्यात येत असून इतकी वर्षे उलटूनही बांधाऱ्याची प्रतीक्षाचं स्थानिक ग्रामस्थांना करावी लागत आहे.









