सातारा :
ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 अंतर्गत एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत 42 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून 148 टन कचरा गोळा केला. या मोहिमेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, विविध सामाजिक संघटना, पंढरपूर शहरातील नागरिक यांनी सक्रिय सहभाग घेऊन विठुरायाची बहुतांश नगरी स्वच्छ केली. या मोहिमेतून पंढरपूर शहर व येथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याचे क्रांतिकारी कार्य घडले असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासे, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सरचिटणीस गणेश चिवटे, पंढरपूर मंडलअध्यक्ष सुभाष मस्के, शहराध्यक्ष लाला पानकर, करकंब मंडलअध्यक्ष हर्षल कदम, बाळासाहेब एरंडे, उल्हास धायगुडे माळशिरस, करमाळा, बार्शी माढा विभागाचे भाजपचे मंडल अध्यक्ष यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 चा समारोप कार्यक्रम प्रसंगी ना. जयकुमार गोरे म्हणाले, या स्वच्छता अभियानातून श्री विठुरायाची नगरी स्वच्छ करण्याचे काम आपल्या सर्वांच्या श्रमातून झाले आहे. ही वारी पूर्वीची स्वच्छता असून वारीनंतरही स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सोलापूर जिह्यासह सातारा जिह्यातील ही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून सात ते आठ हजार स्वयंसेवक, नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये तरुणांचा सहभाग ही महत्त्वपूर्ण बाब होती व पुढील काळात स्वच्छतेच्या संदेशाबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करतील.
पंढरपूर शहरातील सर्व नागरिक व्यापारी, व्यावसायिकांनी आपापल्या दुकानासमोर कचरा टाकण्यासाठी छोट्या कचरा पेट्या ठेवाव्यात व त्यामध्येच कचरा टाकून तो नगरपालिकेच्या कचरा संकलन टीम कडे द्यावा. त्याप्रमाणेच विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत येणाऱ्या वारकरी, भाविकांनीही कचरा कोठेही रस्त्यावर टाकू नये नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जवळपासच्या कचराकुंड्यामध्येच कचरा टाकावा, असे आवाहन गोरे यांनी करून स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ चंद्रभागा, नमामी चंद्रभागा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
पंढरपूर हे संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचे व पवित्र धार्मिक ठिकाण आहे. या विठुरायाच्या नगरीचा सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. पंढरपूरच्या कॉरिडॉरविषयी सर्वांच्या संमतीनेच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गोरे यांनी दिली. तसेच सर्व मानाच्या पालख्यांसह अन्य पालख्या, दिंड्या यांचे प्रस्थान पंढरपूरसाठी झालेले आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आल्यानंतर या सर्वांना सर्वोच्च व्यवस्था प्रदान केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, सामाजिक संस्था, नागरिक व स्वयंसेवक यांचे त्यांनी कौतुक केले.
प्रारंभी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रास्ताविकात स्वच्छता अभियानाचे महत्त्व सांगून प्रशासनाच्या वतीने येथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. तर मोहिमेत सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आभार मानले.








