उन्हाळ्यापूर्वीच दाह : पुढील दोन दिवस हीच स्थिती
पणजी ; शुक्रवार हा गोव्यातील यावर्षीचा सर्वाधिक तापदायक दिवस ठरला. तापमान चक्क 37.8 डि. से. एवढे पोहोचले. उष्णतेची भर दुपारी झळ बसल्याने नागरिकांना त्याचा फारच त्रास सहन करावा लागला. पुढील 48 तासांमध्ये गोव्यातील तापमान हे 4 ते 5 डि. से. ने वाढत जाईल, असा इशाराच हवामान खात्याने दिला आहे. यंदाचा फेब्रुवारी महिना हा गोव्यात गेल्या 30 वर्षांमध्ये सर्वाधिक तापदायक महिना ठरला, असे जाहीर झाले आहे. आता मार्च उजाडला तरी तापमान खाली उतरण्याचे नाव घेत नाही. गेले काही दिवस राज्यातील पारा वाढतच आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पारा 35 च्या पुढे राहिला आणि काल शुक्रवारी तर तापमान 38 डि.से.च्या आसपास पोहोचले. हवामान खात्याने पुढील दोन तीन दिवस तापमान वाढणार, असे म्हटलेले आहे. म्हणजेच 38 डि.से.पर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे. गेल्या कित्येक वर्षांनंतर राज्यात उष्णतेची लाट बरेच दिवस स्थीर राहिलेली आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्यात थंडी, पडसे, ताप इत्यादींची बाधा होऊ लागलीय. उन्हाळ्याचे दिवस सुरू होण्याआधीच तापमान वाढल्याने जनतेच्या अडचणी वाढल्या आहेत. पुढील दोनचार दिवस दुपारचे तापमान असेच वाढलेले दृष्टीस पडणार आहे.









