म्हादईसाठी पर्यावरणप्रेमींचा निर्धार ; साखळीऐवजी विर्डीत होणार आयोजन
प्रतिनिधी /पणजी
म्हादईचे अस्तित्व टिकवणे आणि तिचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असतानाही आम्हाला साखळी पालिकेने सभेसाठी परवानगी नाकारली. यावरूनच सरकारचे म्हादईप्रेम किती आहे, ते स्पष्ट होते. त्यामुळे आम्हाला जरी साखळी पालिकाक्षेत्रात सभेसाठी परवानगी नाकारली असली तरी ठरल्यानुसार साखळी मतदारसंघातील विर्डी या ठिकाणी सभा आम्ही घेऊन म्हादईचा आवाज सरकार दरबारी पोहचवू, असा निर्धार आज पर्यावरणप्रेमींनी पणजीतील आझाद मैदानावर व्यक्त केला.
विर्डी-आमोणा पुलाशेजारी 16 जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजता ही सभा घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. 16 जानेवारी हा जनमत कौल दिवस असल्याने हा दिवस आम्ही म्हादईच्या लढय़ासाठी निवडण्यात आल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगताना भाजप सरकार लोकांचा आवाज दाबत आहे, या कृतीचा निषेध करीत असल्याचे ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ या संघटनेने सांगितले.
ऍड. हृदयनाथ शिरोडकर म्हणाले, भाजप सरकार हे म्हादईप्रश्नी गंभीर नाही. त्यांना लोकांचा आवाज दाबायचा असल्यानेच आम्हाला साखळी येथील बाजाराचे निमित्त करून परवानगी नाकारली. येथील सभेला जर मुख्यमंत्र्यांनी हिरवाकंदील दिला असता तर लोकभावनांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांना ताकद मिळाली असती, परंतु मुख्यमंत्री सावंत यांना काहीच पडून गेलेले नाही. म्हणूनच सभेला परवानगी नाकारली. परंतु पर्यावरणप्रेमी म्हादई बचावसाठी ठाम असून, ते 16 जानेवारीलाच विर्डी येथे आपली सभा घेऊन केंद्रात गोव्यातील जनतेचा आवाज पोहचवला जाईल, असेही ते म्हणाले.
पर्यावरणप्रेमी प्रजल साखरदांडे म्हणाले, म्हादई नदीच्या पाण्यावर राज्यातील सहा तालुके अवलंबून आहेत. कर्नाटकने म्हादईचे पाणी पूर्णपणे वळविल्यास गोव्यावर मोठे जलसंकट येणार आहे. गोव्यात मुबलक पाणीसाठा असला तरी म्हादई हीच आमची जीवनदायनी आहे. त्यामुळे सरकारने लोकांच्या पाठिशी राहून साथ द्यावी, असे आवाहनही केले.
सर्व आमदारांनी घ्यावा सहभाग
म्हादई नदी ही गोव्याची माता आहे. या मातेलाच आपल्यापासून जर कुणी हिरावून घेत असेल तर प्रत्येकाने पेटून उठायला हवे. राज्यातील सर्व आमदारांनी आपली म्हादई नदी वाचविण्यासाठी 16 रोजी होणाऱया जाहीर सभेला उपस्थित राहून गोमंतकीय जनतेचा आवाज केंद्रात पोहचविण्याबरोबरच म्हादई नदीला कुणाच्याही घशात घालू देऊ नये, यासाठी सर्व 40 आमदारांनी म्हादईसाठी एकत्र येऊन सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी आज केले.









