अध्याय पंधरावा
योगी स्वेच्छेने शरीररत्याग करू शकतो त्याबद्दल सांगताना भगवंत म्हणाले, योग्याला जर शरीराचा त्याग करावयाचा असेल तर त्याने टाचेने गुदद्वार दाबून धरून प्राणवायूला अनुक्रमे हृदय, छाती, कंठ आणि मस्तकात घेऊन जावे नंतर ब्रह्मरंध्राच्या मार्गाने त्याला ब्रह्मामध्ये लीन करून शरीराचा त्याग करावा. गुदद्वाराच्या ठिकाणी डाव्या पायाची टाच जोराने रेटून बसवावी आणि गुदद्वार अशा रीतीने बंद करून अपानवायूचे खाली जाणे बंद करावे. हृदयामध्ये वावरणारा जो प्राण असतो, तो नेहमी वरवर जात असतो, त्याला प्राणायामने आवरून धरून अधोमुख करावा. अशा रीतीने अपानवायूचे खाली जाणे बंद झाल्यामुळे तो वर चढून जेव्हा स्वाधि÷ानचक्रापर्यंत पोहचेल व प्राणही अधोमुख होऊन खाली येत येत त्याच चक्रापर्यंत येईल, तेव्हाच त्या चक्रामध्ये प्राणापानांचे ऐक्मय होऊन समसमान होतात आणि त्या दोहोंचा मिलाफ झाला म्हणजे ते दोन्ही एकरूप होऊनच पुढील मार्गाचे उल्लंघन करतात.
अपानाचा अधोमार्ग असतो तोही सुटतो, प्राण हृदयातून गळय़ाकडे जात असतो तोही जाईनासा होतो आणि दोघेही सुषुम्नेचे द्वार खुले करून तिच्या विवरातूनच नीट सरळ वर जाऊ लागतात.
ह्याप्रमाणे सुषुम्नेचे स्थान सर झाले म्हणजे ते तसेच पुढे घुसून मार्गात असणाऱया सहाही चक्रांचे पडदे दूर करून ब्रह्मरंध्रात जाऊन पोहचतात. तेथे ते नीट रीतीने जाऊन पोहचले की, असलेल्या देहाची स्थिती सोडून जो देह धारण करण्याची त्याच्या मनात इच्छा असते, तो देह योग्याला प्राप्त होतो. वैकुंठ, कैलास किंवा अमरावती येथे जावयाचे किंवा सार्वभौम चक्रवर्ती व्हावयाचे, अशा प्रकारची जी इच्छा तो मनात आणितो, ती स्थिती तो तत्काळ पावतो. जर तो ब्रह्मस्वरूपाची इच्छा धरेल, तर पूर्वदेहाचे भान सोडून शुद्ध ब्रह्माच्याच ध्यानात तो निमग्न होईल आणि तो स्वतःसिद्ध ब्रह्मच होईल. याप्रमाणे प्राणाचे धारण करून जो आपला देह ठेवतो, तेच त्याचे स्वच्छंद मृत्यूचे लक्षण होय. कळिकाळसुद्धा त्याच्या आधीन असतो. ज्याला देवतांच्या विहारस्थलांमध्ये क्रीडा करण्याची इच्छा असेल त्याने माझ्या ठिकाणच्या सत्त्वगुणाचे ध्यान करावे. त्यामुळे सत्त्वगुणाच्या अंशस्वरूप अशा सुरसुंदरी विमानात बसून त्याच्याजवळ येऊन पोहोचतात. देवांच्या दिव्य उपभोगामध्ये योग्याचे चित्त आसक्त झाले असेल, तर त्याने ते उपभोग मिळण्याकरिता खरोखर माझ्या सत्वाचीच धारणा करावी. ज्या सत्वाच्या योगाने मी स्वर्गामध्ये देवांची स्थापना केली आहे, त्या सत्वगुणाचीच धारणा जो आपल्या हृदयामध्ये ठेवतो त्याने देवांगनांची इच्छा धरिली असता त्याला स्वर्गातील देवाचाही मान मिळतो. तो विमानात बसून अप्सरांशी यथेच्छ कामविलास भोगतो. माझ्याशी परायण झालेल्या योग्याने, सत्यसंकल्परूप अशा माझ्यामध्ये चित्त स्थिर केले असेल त्याचा संकल्प सिद्ध होतो.
मनाने ज्या वेळी जो संकल्प तो करतो, त्याचवेळी त्याचा तो संकल्प सिद्ध होतो. संकल्पानेच सर्व कार्ये करणारा मी सत्यसंकल्प भगवान असून माझ्या ठिकाणी विश्वासपूर्वक जो आपले चित्त ठेवतो तो ज्या ज्या काळी, ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या कामात आणि ज्या ज्या स्थितीत ज्याची ज्याची मनात इच्छा करेल, त्याचे ते ते मनोरथ नेहमी सफल होतात. जो ध्यानधारणेने मला हृदयात धरेल, त्याचे मन ज्या ज्या इच्छा करते, त्याच्या त्या इच्छा पूर्ण होतात.
‘ईशित्व’ आणि ‘वशित्व’ अशा दोन्ही सिद्धींचा स्वामी असलेल्या माझ्या त्या रूपाचे चिंतन करून जो त्याच भावाने युक्त होतो. माझ्याप्रमाणेच त्याची आज्ञासुद्धा कोणी टाळू शकत नाही. सर्वांचा नियंता व खरोखर स्वतः स्वतंत्र असलेल्या माझे ध्यान केले असता योग्याला मत्स्वरूपच प्राप्त होते. त्याची आज्ञा श्रे÷ देवसुद्धा शिरसावंद्य करतात. तसेच पशुपक्षी देखील त्याची आज्ञा उल्लंघन करत नाहीत.