कायदा-सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
आमचे काम आम्ही करतो. मात्र प्रसारमाध्यमांनीही योग्यप्रकारे माहिती समाजासमोर दिली पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याचे विपरित परिणाम होतात. तेव्हा माध्यमांनी कोणतेही वृत्त देताना दोन्ही बाजू योग्यप्रकारे मांडाव्यात, असे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोणत्याही गोष्टी वारंवार प्रसिद्ध केल्यानंतर त्याचा समाजावर विपरित परिणाम होतो. एकाच व्यक्तीचे कोणत्याही प्रकारचे वृत्त वारंवार दाखविल्यास संबंधित व्यक्तीला आपण एक मोठी व्यक्ती झालो असे वाटू लागते. त्यामुळे त्याचा परिणाम इतर घटकांवर होतो. तेव्हा प्रत्येकाने वृत्त प्रसिद्ध करताना संपूर्ण माहिती घेऊन योग्यप्रकारे समाजासमोर प्रसिद्ध करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जिह्याचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे पोलिसांवर अधिक ताण पडत आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलीस स्थानक निर्माण करणार काय? याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्याची काहीच गरज नाही. यापूर्वी जिल्हा पोलीस प्रमुखच शहरासह संपूर्ण जिह्यावर नियंत्रण ठेवत होते. आता तर बेळगावला स्वतंत्र पोलीस आयुक्त कार्यालय देण्यात आले आहे. त्यामुळे आणखी पोलीस कार्यालयाची काहीच गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
यमकनमर्डी पोलीस स्थानकातून पाच किलो सोन्याचे दागिने असलेली कार गायब करण्यात आली. याप्रकरणी तुम्ही कोणावर कारवाई केलात का? हे विचारले असता हे प्रकरण सध्या सीआयडीकडे आहे. त्यामुळे त्याबद्दल आम्ही काहीच बोलू शकत नाही. माझ्या अखत्यारित येणारे प्रश्न विचारला तर त्याबद्दल निश्चित माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले. एडीजीपी अलोककुमार हे संपूर्ण राज्यातील विविध जिह्यांना भेट देत आहेत. त्याचप्रकारे बेळगाव जिह्याला त्यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी बेळगाव उत्तरचे पोलीस महासंचालक सतीशकुमार, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या हे उपस्थित होते.









