चौथ्या रेल्वेगेट परिसरात पाहणी : कचराकुंडीमध्येच कचरा टाकण्याची सूचना
बेळगाव : अनगोळ येथील चौथ्या रेल्वेगेटजवळील हॉटेल व्यावसायिक उघड्यावरच कचरा टाकत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. याबाबत नागरिकांनी महापौरांकडे तक्रारी केल्या होत्या. यामुळे मंगळवारी रात्री अचानकपणे बाबले गल्ली येथे बांधण्यात आलेल्या भूमीगत कचराकुंडीला भेट दिली. त्यावेळी तेथील हॉटेल चालकांना कचराकुंडीमध्येच कचरा टाकावा, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली. महापौर शोभा सोमणाचे आणि वॉर्ड निरीक्षक अनिल बोरगावी यांनी संयुक्तपणे या परिसरात भेट दिली. पाहणी केली असता हॉटेल चालकांनी उघड्यावरच कचरा फेकून दिला होता. अन्नही टाकण्यात आले होते. यामुळे हॉटेल चालकांना धारेवर धरण्यात आले. यापुढे जर कचरा उघड्यावर टाकला तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. बेळगाव शहर स्वच्छ ठेवण्यासाठी साऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशाप्रकारे जर रस्त्यावर कचरा फेकला तर बेळगाव स्वच्छ कसे होणार? असा संतप्त सवालही विचारण्यात आला. हॉटेल चालकांना यापुढे संबंधित डस्टबीनमध्येच कचरा टाकावा, असे त्यांनी सांगितले.









