पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील कमाल तापमानात पुढील पाच दिवसांत 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला. तर दुसरीकडे पुढील दोन दिवस राज्यभर तुरळक पावसाची शक्यता आहे.
उत्तरेकडच्या भागात पश्चिम प्रक्षोभ कार्यरत आहे. राजस्थान व लगतचा भाग, राजस्थान ते दक्षिण उत्तर प्रदेशच्यापर्यंत तसेच दक्षिण छत्तीसगड ते तेलंगणापर्यंत हवेची द्रोणीय स्थिती आहे. यातच अरबी समुद्राकडून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने देशातील अनेक भागांत पावसाचा मारा सुरू आहे.
महाराष्ट्राच्या अनेक भागांत गेले दोन दिवस पाऊस सुरू आहे. अनेक भागात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह वादळी पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांत कमाल तापमानाचा पारा चाळेशीच्या पार पोहोचला आहे.
पावसाचा शिडकावा; कमाल तापमान वाढणार
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात मंगळवारी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे, तर बुधवारी केवळ विदर्भात ‘यलो अलर्ट’ आहे. दुसरीकडे पुढील पाच दिवसांत राज्यातील कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असल्याने पुन्हा उन्हाच्या झळा वाढणार आहेत.