पुणे / प्रतिनिधी :
बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळामुळे येत्या दोन दिवसांत देशभरातील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला. दरम्यान, बंगालच्या उपसागरात 7 मेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र त्यानंतर 9 मेपर्यंत त्याचे वादळात रुपांतर होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
यावर्षातील पहिले चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण होत आहे. 9 मेपर्यंत या वादळाची निर्मिती होणार असून, 11 मेपर्यंत ते मध्य बंगालच्या उपसागरात येईल. यामुळे पूर्व किनारपट्टीला अलर्ट देण्यात आला आहे. त्यातही ओरिसा व पश्चिम बंगाल राज्यांना सध्या विशेष अलर्ट देण्यात आला आहे. यासाठी प्रशासनाची बैठकही पार पडली आहे.
कमाल तापमान वाढणार
बंगालच्या उपसागरातील वादळी यंत्रणा बाष्प खेचून घेत असल्याने येत्या दोन दिवसांत वायव्य, मध्य, दक्षिण तसेच पूर्व भारतात कमाल तापमानात 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात तुरळक पाऊस
महाराष्ट्राच्या काही भागात पुढील तीन दिवस तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशभरात सध्या कोठेही उष्णतेची लाट नाही. तसेच पुढील आठवडय़ापर्यंत ती येण्याची शक्यताही नाही.









