रायगड : प्रतिनिधी
पनवेल रेल्वे मार्गावर मालगाडी घसरल्याने त्या मार्गावरून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या गाड्या खोळंबल्याने प्रवाशांचे मात्र अतोनात हाल झाले. पनवेल रेल्वे मार्गावरील या घटनेमुळे महाड तालुक्यातील विन्हेरे, वीर, करंजाडी स्थानकावर रेल्वेगाड्या थांबविण्यात आल्या होत्या. मत्स्यगंधा एक्सप्रेस सुमारे आठ तासांपासून विन्हेरे रेल्वे स्टेशनवर खोळंबलेल्या अवस्थेत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
आज सकाळी ६ वाजल्या पासूनच या प्रवाशांच्या अडचणी सुरू झाल्याची माहिती मिळाली. सुमारे सहा तास या प्रवाशांना पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नव्हते तसेच त्यांची उपासमार झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. जवळपास दीड ते दोन हजार प्रवासी या गाडीने प्रवास करीत होते असे उपलब्ध माहितीद्वारे कळते. वीर रेल्वे स्थानकावर कोकणकन्या करंजाळी येथे सावंतवाडी ते सीएसटी या गाड्या तसेच कोलाड रेल्वे स्थानकावर मडगाव वरून सुरत कडे जाणारी हॉलिडे एक्सप्रेस नागोठणे रेल्वे स्थानकावर कुडाळ गणपती एक्सप्रेस या गाड्या थांबवण्यात आल्या होत्या.बहुतांश स्थानके ही दुर्गम भागात असल्यामुळे कोणतीही सोय उपलब्ध होऊ शकत नव्हती तरीदेखील जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करण्यात आले. स्थानिक नागरिक आणि सेवाभावी संघटनांनी पुढाकार घेऊन प्रवाशांसाठी पाणी, बिस्कीट, नाष्टा याची व्यवस्था केल्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय दूर झाली.
याबाबत विन्हेरे रेल्वे प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रवाशांसाठी पाण्याची तसेच लहान मुलांसाठी दुधाची व्यवस्था केली असून पनवेल मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी बससह खाजगी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु ही एक्सप्रेस रद्द झाली नसून पुढील सूचना आल्यानंतर ती मार्गस्थ होईल. तसेच हे ग्रामीण भागातील रिमोट स्टेशन असल्यामुळे इथे अन्य सुविधा उपलब्ध नसताना देखील आम्ही प्रवाशांसाठी शक्यतोपरी मदत करण्याचे सर्व प्रयत्न करीत आहोत.असे यावेळी विन्हेर रेल्वे स्थानक प्रशासनाकडून अधिकृतरित्या सांगण्यात आले. कोकण रेल्वेच्या या प्रकाराने प्रवाशांचे मात्र अतोनात हाल झाल्याचे चित्र पाहावायास मिळाले.