वृत्तसंस्था/ श्रीनगर
पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मंगळवारी मोठी माहिती समोर आली. गुप्तचर यंत्रणेनुसार या हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानचा माजी एसएसजी कमांडर हाशिम मूसा आहे. मूसा सध्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे काम करतोय. लष्कर-ए-तोयबानेच त्याला सुरक्षा दल आणि बिगरकाश्मिरींवर हल्ला करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पाठविले होते.
मूसाने यापूर्वी गांदरबलच्या गगनगीरमध्ये ऑक्टोबर 2024 मध्ये हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक मजूर आणि स्थानिक डॉक्टराचा मृत्यू झाला होता. तसेच बारामुल्ला येथील हल्ल्यातही तो सामील होता, या हल्ल्यात 2 सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. तर 2 पोर्टर्सना जीव गमवावा लागला होता.
चकमकीत मारला गेलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जुनैद अहमद भटच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या छायाचित्राद्वारे मूसाची ओळख पटविली आहे. जुनैद हा डिसेंबर महिन्यात दाचीगम येथील जंगलामध्ये मारला गेला होता. चकमक स्थळी त्याच्या मृतदेहाजवळून एक मोबाईल हस्तगत करण्यात आला होता, यात मूसा तसेच अन्य दहशतवाद्यांसोबत त्याची छायाचित्रे होती.
काश्मीर आमचे, सैन्यामुळे सर्व सुरक्षित
डोडाच्या भदरवाह येथे मंगळवारी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. अनेक पर्यटकांनी यावेळी तिरंगा हातात घेत भारतमाता की जय अशा घोषणा दिल्या. तर दुसरीकडे केंद्रशासित प्रदेशच्या सरकारने सुरक्षा कारणांस्तव 87 पर्यटनस्थळांपैकी 48 पर्यटनस्थळे बंद केली आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात काही स्लीपर सेल सक्रिय झाले असून त्यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून कारवाया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समोर आले आहे. याचमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा
जामिया विद्यापीठात काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वत: नजर ठेवून आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उत्तराखंड, हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांदरम्यान भीतीचे वातावरण होते. अमित शहा यांनी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि पोलीस प्रमुखांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राथमिकता देण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती जम्मू-काश्मीर स्टुडंट्स असोसिएशनचे संयोजक नासिर खुहामी यांनी दिली.









