अझरबैजानमध्ये सचिनला झाली अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा सूत्रधार गँगस्टर सचिन थापनला मंगळवारी भारतात आणले गेले. दिल्ली विमानतळावर कडेकोट बंदोबस्तात विशेष पथक सचिनला घेऊन भारतात पोहोचले. सचिनचा ताबा मिळविण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचे पथक अझरबैजान येथे गेले होते.
सचिन हा गँगस्टर लॉरेन्सचा भाचा आहे. मूसेवालाच्या हत्येचा कट रचणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होता. हत्येच्या काही काळापूर्वी सचिन हा लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईसोबत बनावट पासपोर्टच्या मदतीने विदेशात पळाला होता. सचिनचे नाव मूसेवाला हत्याप्रकरणाच्या आरोपपत्रात नमूद आहे.
दुबईत राहत असलेल्या दिल्लीतील उद्योजकाकडून सचिनने 50 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. टी-10 टीमच्या मालकाकडून 50 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या कॉलचे रिकॉर्डिंग व्हायरल झाले होते. याचप्रकरणी सचिनला अटक करण्यात आली आहे.
गँगस्टर सचिनचा बनावट पासपोर्ट दिल्लीच्या संगम विहार भागातील एका पत्त्यावर तयार करण्यात आला होता. या बनावट पासपोर्टमध्ये त्याने तिलक राज टुटेजा असे नाव बदलले होते. पोलिसांनी बनावट पासपोर्ट तयार करणाऱ्या टोळीला जेरबंद केल्यावर या प्रकारचा खुलासा झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसमवेत 5 जणांना अटक केली होती.
कॅनडातून टोळी चालविणारा सतिंदरजीत सिंह उर्फ गोल्डी बराड तिहार तुरुंगात कैद काला जठेडी आणि लॉरेन्स बिश्नोईसोबत संपर्क साधून सचिनने मूसेवालाच्या हत्येचा कट रचला होता. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांना सुगावा लागू नये म्हणून सचिन हा फोनवरील संभाषणादरम्यान गँगस्टर गोल्डी बराडला ‘डॉक्टर’ असे संबोधित होता.









