तुळशी विवाहानंतर विवाह इच्छुकांची लगबग : कार्यालये, कापड-सोने-चांदी दुकाने सज्ज : भटजींची होणार दमछाक
महेश शिंपुकडे /निपाणी
विवाह इच्छुकांचे लक्ष लागून राहिलेला तुळशी विवाह सोहळा नुकताच झाला. तुळशी विवाह होण्यापूर्वीच नियोजन करण्यात आलेले विवाह सोहळे पहिल्या मुहूर्तावरच पार पडले. भारतीय संस्कृतीत विवाह सोहळय़ांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच तो पार पाडण्यासाठी पंचांग शास्त्राचा आधार घेत मुहूर्ताला महत्त्व दिले जाते. सन 2022-23 सालच्या पंचांगानुसार जून 2023 अखेरपर्यंत मुहूर्तांची मांदियाळी असून सात महिने विवाह सोहळय़ांनी गजबजणार आहेत.
विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या जीवनात आनंदाला भरते आणणारा क्षण. म्हणून हा क्षण, सोहळा प्रत्येकजन मोठय़ा उत्साहाने साजरा करण्याला पसंती देतो. वाढत्या महागाईत खर्चावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होतो. पण कोरोनाच्या संकटातून नवी शिकवण घेत कोणतेही सोहळे अमर्याद उत्साहात साजरे करण्याची मानसिकता वाढली आहे.
विवाह सोहळय़ाचे नियोजन कुठे करायचे हा प्रश्न पुढे येतो. यासाठी कार्यालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. कार्यालयांच्या माध्यमातून स्वामी, भटजी, सजावटकार, फोटोग्राफर, आचारी, जेवणाचे साहित्य उपलब्ध करून देण्याची तयारी केली जात आहे.
शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागातील लोकही कार्यालयालाच पसंती देताना दिसत आहेत. यामुळेच ग्रामीण भागातही कार्यालयांची संख्या वाढताना दिसत आहे. ग्रामदैवत परिसरात कार्यालय निर्माणासाठी प्रयत्न होताना दिसतात.
डीजेचा दणदणाट वाढणार
विवाह सोहळय़ात वाद्याला अधिक महत्त्व दिले जाते. पारंपरिक वाद्यांचा वापर बहुतांशी होतो. पण वरातीवेळी डीजेचा वापरण्याला सर्वांचीच मागणी असते. यंदा गणपती, नवरात्री यासह सर्वच उत्सवांमध्ये शासनाने डीजेवरील मर्यादा उठविल्या आहेत. यामुळे लग्न समारंभात डीजे वाजवायचाच याची तयारीही सुरू झाली आहे. यामुळे यंदा आनंदात भर घालणाऱया डीजेचा वापर वाढणार असे बोलले जात आहे.
विवाह मुहूर्त
महिना | विवाह मुहूर्त तारीख |
नोव्हेंबर 2022 | 26, 27, 28, 29 |
डिसेंबर 2022 | 2, 4, 8, 9, 14, 16, 17, 18 |
जानेवारी 2023 | 18, 26, 27, 31 |
फेब्रुवारी 2023 | 6, 7, 10, 11, 14, 16, 22, 23, 24, 27, 28 |
मार्च 2023 | 8, 9, 13, 17, 18 |
एप्रिल 2023 | मुहूर्त नाहीत |
मे 2023 | 2, 3, 4, 7, 9, 10, 11, 12, 15, 16, 21, 22, 29, 30 |
जून 2023 | 1, 3, 7, 8, 11, 12, 13, 14, 23, 26, 27, 28 |
एप्रिल महिन्यात मुहूर्त नाही
एप्रिल महिन्यात एकही मुहूर्त नाही. या महिन्यात बहुतांशी यात्रा, उत्सव असतात. यंदा विधानसभा निवडणूकही एप्रिल महिन्यातच होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे एप्रिल महिन्यात मुहूर्त नसल्याचा लाभ प्रत्येकाला होणार आहे. विवाह मुहूर्त लक्षात घेऊन संबंधित व्यावसायिक आपला व्यवसाय पूर्ण तयारीने ठेवत आहेत. यावर्षीच्या विवाह सोहळय़ाच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होणार असल्याचे दिसत आहे, असे पंचांगतज्ञ ज्योतिषाचार्य दयानंद स्वामी यांनी सांगितले.