साखरमाळा, पंचांग, गुढीच्या काठ्या, तयार गुढ्या मागणीतही वाढ
बेळगाव : गुढीपाडवा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साहित्याने सजली आहे. विशेषत: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू, पंचांग, साखरगाठी, रेशीम वस्त्र, कडूलिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या, फुलांच्या माळा, तांबा-पितळ, रांगोळी, पताका आणि गुढीसाठी बांबूची काठी आदी वस्तूंची खरेदी होत आहे. त्यामुळे बाजारात नागरिकांची रेलचेल दिसून येत आहे. शहरातील पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, मेणसी गल्ली, खडेबाजार, कडोलकर गल्ली आदी ठिकाणी गुढीपाडव्याचे साहित्य दिसून येत आहे. विशेषत: बुरुड गल्लीत गुढीसाठी बांबूच्या काठ्यांची विक्री सुरू झाली आहे. रेडिमेड गुढ्यांची मागणीही वाढत आहे. बाजारात प्लास्टिकमध्ये लहान आणि मोठ्या आकारामध्ये गुढ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने, नवीन वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी गृहोपयोगी साहित्य खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे शोरुम्स सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारासह सराफी दुकाने आणि शोरुम्समध्ये वर्दळ वाढू लागली आहे. विशेषत: पांगुळ गल्ली, गणपत गल्ली आणि मारुती गल्लीत नवीन पंचांग आणि साखरेच्या माळा खरेदीला गर्दी होऊ लागली आहे. साखरेच्या दरात वाढ झाल्याने साखरेच्या माळांच्या किमती वाढल्या आहेत. केशरी, पांढऱ्या, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगांच्या साखरमाळा विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
गुढी खरेदीला ऊत
गुढीपाडव्यादिवशी घरासमोर डौलाने उंच गुढी उभारून सण साजरा केला जातो. त्यामुळे गुढी खरेदीला ऊत आला आहे. बुरुड गल्ली येथे पारंपरिक पद्धतीने गुढीच्या काठ्या विक्रीसाठी ठेवल्या जातात. या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. शंभर ते दोनशे रुपये असा एका गुढीच्या काठीचा दर आहे. बुधवारी गुढीपाडवा असल्याने सोमवारीच बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.









