जागतिक बाजारांमधील वातावरणाचा परिणाम : सेन्सेक्स 268 तर निफ्टी 97 अंकांनी वधारले
मुंबई :
चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात सकाळी सुरुवातीच्या काळात निर्माण झालेली घसरणीमधून सावरत सेन्सेक्स व निफ्टी यांनी तेजीचा टप्पा प्राप्त केला आहे. यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीची तेजी प्राप्त करत बाजार बंद झाला आहे. यामध्ये स्टेट बँक,रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अॅक्सिस बँक यांच्या समभागांमधील सकारात्मक कामगिरीने बाजार वधारला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स बुधवारी सकाळी तब्बल 500 अंकांनी घसरणीत राहिला होता, परंतु अंतिम क्षणी मात्र या घसरणीवर मात करत सेन्सेक्स 0.39 टक्क्यांसह 277.98 अंकांच्या मजबुतीसह निर्देशांक 71,822.83 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 96.80 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 21,840.05 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांच्या कामगिरीत बुधवारी प्रामुख्याने सेन्सेक्समधील स्टेट बँकेचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 4.15 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. यासोबतच टाटा स्टील, अॅक्सिस बँक , मारुती सुझुकी, एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा पॉवर आणि कोटक बँकेसह अन्य 17 कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले होते.
दुसऱ्या बाजूला अमेरिकेमधील चलनवाढी संदर्भातील आलेल्या आकडेवारीमुळे आयटी क्षेत्रातील समभाग मोठ्या प्रमाणात घसरणीत राहिले. दरम्यान टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक यांचे समभाग हे घसरुन बंद झाले.
जागतिक पातळीवरील घटनांमध्ये अमेरिकेतील निराशाजनक स्थिती होती, मात्र तरीही भारतीय बाजारात चमक राहिली. यामध्ये स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज , आणि अॅक्सिस बँक यांच्या कामगिरीमुळे बाजार वधारला.
मागील काही दिवसांपासून स्टेट बँकेच्या समभागात तेजी राहिल्याचे दिसून येत आहे. बँकेचे समभाग हे 9 फेब्रुवारी रोजी इंट्रा डेच्या दरम्यान 1 वर्षाचा विक्रम मोडत नवी उंची प्राप्त केली आहे. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे देशातील महागाई दर कमी राहिला असून जानेवारीत चलनवाढ घटून 0.27 टक्क्यांवर आली आहे. खाण्यापिण्याच्या किंमतीमध्येही नरमाई राहिल्याच्या कारणास्तव याचा सकरात्मक प्रभाव हा भारतीय बाजारात झाल्याचे दिसून आले.









