सेन्सेक्समध्ये 529 अंकांची वाढ : आयटी कंपन्या तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी भारतीय शेअरबाजाराने पुन्हा नव्या विक्रमी स्तरावर बंद होण्याचा पराक्रम केला आहे. सेन्सेक्स 529 अंकांच्या दमदार वाढीसह तर सोबत निफ्टीही तेजीसोबत बंद झाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 529 अंकांच्या तेजीसोबत 66,589 अंकांवर विक्रमी स्तरावर बंद झालेला पाहायला मिळाला. याला चांगली साथ देणारा राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 146 अंकांच्या वाढीसह 19,711 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्सने तर एकावेळी इंट्रा डे दरम्यान 66,565 अंकांचा सर्वोच्च स्तरही गाठला होता. निफ्टीत आयटी कंपन्यांचे समभाग तेजीत होते. विप्रोचा समभाग जवळपास 4 टक्के तेजीत होता तर टेक महिंद्रा (2.46 टक्के), एलटीआय माइंडट्री (2 टक्के) यांचे समभागही तेजीसह बाजाराला चांगली साथ देत होते. सेन्सेक्समधील एसबीआय, रिलायन्स, विप्रो, एचडीएफसी यांचे समभाग सर्वाधिक 2 टक्के इतके वधारत बंद झाले. 30 समभागांपैकी 19 कंपन्यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले होते. टायटनचा समभाग मात्र सर्वाधिक 1 टक्का इतका घसरणीत राहिला. पीएनबी, एसबीआय यांचे समभाग 3 टक्के वधारलेले होते. एनएसईवर नव्याने दाखल झालेल्या लॉयड या कंपनीचा समभाग 4 टक्के इतका वधारत बंद झाला. निफ्टीने सोमवारी इतिहासात 19666 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती. डॉ. रे•िज लॅब्ज आणि रिलायन्स यांचे समभागही 2 टक्के इतकी तेजी राखून होते. सकाळी शेअरबाजाराची सुरुवात होताच केवळ 1 तासातच अनेक विक्रम मोडले गेले. सेन्सेक्सने विक्रमी स्तरावर सुरुवात करत 66310 अंकांवर सर्वकालिक पातळी गाठली होती. निफ्टीनेही ऐतिहासिक 19641 अंकांवर सर्वकालिक पातळीवर पोहचण्यात यश मिळवलं होतं. जागतिक बाजारात युरोपियन बाजारात घसरण होती. अमेरिकेत डोव्ह जोन्स 113 अंकांनी तेजीत होता.









