अॅडव्हान्स बुकींगसाठी शोरुम्स सज्ज : गोडवा वाढविणार साखरेच्या माळा : वाहनांच्या किमती वाढल्या तरी खरेदीसाठी झुंबड
बेळगाव : हिंदू नववर्षाचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या सणाने होतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत होते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या या मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. गुढीपाडवा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने खरेदीसाठी बेळगाव बाजारात गर्दी उसळत असून विविध साहित्य विक्रीसाठी बाजारात आले आहे. नववर्षाचे स्वागत घरोघरी गुढी उभारून केले जाते. त्यामुळे गुढीसाठी लागणाऱ्या बांबूच्या काठ्या, साखर माळा, गुढीसाठी लागणारे वस्त्र यासह इतर साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. शहरातील बुरुड गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली परिसरात बांबूच्या काठ्यांची विक्री केली जात आहे.
यावर्षी 100 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत बांबू उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्वीटमार्ट व चुरमुरे भट्ट्यांमधील साखरेच्या गाठी उपलब्ध आहेत. विविध रंगांमधील गाठी खरेदीही केल्या जात आहेत. शुभमुहुर्त असल्याने सोने,इलेक्ट्रॉनिक-इलेक्ट्रिक वस्तू, वाहने, घर खरेदी केले जाते. गुढी पाडव्यादिवशी होणारी गर्दी पाहता आधीच अॅडव्हान्स बुकींग करून त्या दिवशी फक्त घरी नेऊन पूजा करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे अॅडव्हान्स बुकींगसाठी शोरुम्समध्ये गर्दी होत आहे. यावर्षी सोन्याचा दर प्रचंड वाढला असला तरी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मात्र कमी नाही. गुढीपाडव्याला चांगला व्यवसाय व्हावा यासाठी व्यावसायिकांनीही विविध ऑफर्स ग्राहकांना देऊ केल्या आहेत.
वाहन खरेदीसाठी झुंबड
वाहनांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्या तरी खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. काही शोरुम्समध्ये वाहने उपलब्ध नसल्याने काही दिवस थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आवडता रंग आणि मॉडेल उपलब्ध होण्यासाठी महिन्याभरापूर्वीपासून बुकींग करण्यात आले होते. दुचाकीसह चार चाकी व कमर्शियल वाहने खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी अॅडव्हान्स बुकींग करण्यात आल्याने यावर्षी त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.









