पूजासाहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपड्यांची खरेदी : सोने-चांदीला पसंती : होलसेल फूल मार्केटमध्ये सोमवारी फुलांची मोठी आवक
बेळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या पूर्वसंध्येला विविध वस्तू, सोने, आभूषणे, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी झाली होती. विशेषत: पूजा साहित्याबरोबर फुले, फळे आणि मिठाईची खरेदी झाली. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक शोरुम, कपड्यांची दुकाने आणि मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी पाहावयास मिळाली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी होती. खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवीन वस्तू खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू, नवीन वाहने आणि कपड्यांची खरेदी वाढली होती. त्यामुळे सोमवारी बाजारपेठेत उलाढाल वाढल्याचे दिसून आले. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर हार, फुले, केळीची पाने, आपट्याची पाने, नारळ, अगरबत्ती, लिंबू, कापूर, धूप आदी साहित्याचीही खरेदी झाली. शहरातील विविध भागात झेंडू आणि उसाची आवक वाढली होती. त्यामुळे शहराच्या चौकाचौकात आकर्षक फुलेही दिसून आली. गणपत गल्ली, खडेबाजार, रामदेव गल्ली, पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, काकतीवेस आदी ठिकाणी खरेदीची वर्दळ पाहावयास मिळाली. दसऱ्याला नवीन खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे ज्वेलरी दुकानांमध्ये सोन्या-चांदीची खरेदी अधिक प्रमाणात झाली.
उसाची आवक
खंडेनवमी आणि दसऱ्यासाठी शहरात उसाची आवक वाढली होती. हिंडलगा, काकतीवेस रोड, बसस्टँड रोड, काँग्रेस रोड, खानापूर रोड, सम्राट अशोक चौक, सदाशिवनगर आदी ठिकाणी उसाची विक्री झाली. ऊस लावून शस्त्रs आणि वाहनांची पूजा केली जाते. त्यामुळे उसाची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.
अशोकनगर येथील फूल मार्केटमध्ये आवक
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर अशोकनगर येथील होलसेल फूल मार्केटमध्ये सोमवारी पहाटे फुलांची मोठी आवक झाली होती. झेंडू, शेवंती, गुलाब, अॅस्टर आदी फुले पाहावयास मिळाली. विशेषत: झेंडूच्या फुलांची खरेदी-विक्री अधिक प्रमाणात झाली.
झेंडू खातोय भाव
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर होलसेल फूल मार्केट आणि किरकोळ बाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढली होती. विविध ठिकाणी झेंडूची विक्री झाल्याचे पाहावयास मिळाले. मात्र, दर आवाक्याबाहेर गेले होते. एरव्ही 10 ते 20 रुपये किलो दराने मिळणारा झेंडू 60 रुपये किलो झाला होता. मात्र, सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात झेंडूची खरेदी झाली.









