लाईटिंग, सजावटीचे साहित्य दाखल : खरेदीला येणार उधाण
प्रतिनिधी/ बेळगाव
गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात गणेशोत्सवाचे साहित्य दाखल झाले आहेत. विविध साहित्यांनी बाजारपेठ बहरू लागली आहे. शिवाय खरेदीसाठीही नागरिक दाखल होऊ लागले आहेत. घरगुती गणेशोत्सवाबरोबर सार्वजनिक मंडळांची धावपळ सुरू आहे.
शहरातील गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, भेंडीबाजार, मेणसी गल्ली, नरगुंदकर भावे चौक, टिळक चौक, किर्लोस्कर रोड, काकतीवेस रोड, शनिवार खूट आदी ठिकाणी गणेशोत्सवाच्या साहित्याने दुकाने सजू लागली आहेत. विशेषत: लाईटिंग, प्लास्टिक माळा, सजावटीचे साहित्य, थर्माकोलचे मखर यासह इतर साहित्य दाखल झाले आहे. त्याचबरोबर पूजेचे साहित्य, फटाके आणि इतर साहित्याची खरेदी होऊ लागली आहे. विविध रंगांमध्ये विद्युत रोषणाईसाठी लाईटिंगच्या माळा दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठ झगमगू लागली आहे.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणरायाला प्रिय असलेले मोदक, मिठाई आणि इतर साहित्याची आवक वाढू लागली आहे. स्वीट मार्टमध्ये विविध प्रकारचे मोदक पाहावयास मिळत आहेत. सध्या असलेला श्रावणमास आणि तोंडावर आलेला गणेशोत्सव यामुळे बाजारात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे.
घरगुती गणेशमूर्तींसाठी कार्यशाळेत नागरिकांची वर्दळ वाढत आहे. गणेशमूर्ती खरेदीसाठी आगावू रक्कम दिली जात आहे. त्याबरोबरच गणेशोत्सवाला नवीन वस्तू खरेदीला पसंती दिली जाते. टीव्ही, मोबाईल, इलेक्ट्रिक वस्तू, वॉशिंग मशीन यांनाही मागणी वाढणार आहे. त्याबरोबरच नवीन कपडे खरेदीलाही वेग येणार आहे.









