सेन्सेक्स 259 अंकांनी घसरला, अदानी एंटरप्राइजेस नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील दबावासह शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअरबाजारात विक्रीमुळे घसरण दिसून आली. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते. धातू, ऊर्जा आणि आयटी समभागांमध्ये शुक्रवारी दबाव दिसून आला.
शुक्रवारी सरते शेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 259 अंकांनी (0.41 टक्के) घसरत 62,979 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांकसुद्धा 105 अंकांनी (0.56 टक्के) घसरणीसह 18,665 अंकांवर बंद झाला होता. फार्मा क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये खरेदी पहायला मिळाली. शुक्रवारी अदानी एंटरप्राइजेसचे समभाग सर्वाधिक 7 टक्के इतके घसरलेले पहायला मिळाले. अमेरिकेतील चौकशी एजन्सी हिंडनबर्ग यांच्या अहवालानंतर या समुहातील अमेरिकेतील गुंतवणुकदारांशी चर्चा करत आहे, अशी बातमी पसरली आणि त्याचा नकारात्मक परिणाम अदानी एंटरप्राइजेसवर शुक्रवारी दिसून आला. यावर अदानी समुहाकडून बाजारातील नियमांचे पालन केले जात असल्याचे उत्तर देण्यात आले आहे.
बाजारात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा समभाग 4 टक्के इतका घसरणीत राहिला होता. कंपनीची निधी उभारणीसाठी 28 जूनला सदस्यांची बैठक होणार आहे. या सोबत पीएनबी हौसिंग फायनान्स लि., अरोबिंदो फार्मा यांचे समभागही नुकसानीसह बंद झाले. दुसरीकडे लँडमार्क कार्स लि. चे समभाग सर्वाधिक 8 टक्के इतके बाजारात वाढताना दिसले. एशियन पेंट्स, बजाज ऑटो, भारती एअरटेल, डॉ. रे•ाrज लॅब्स, एचसीएल टेक, एचडीएफसी यांचे समभाग तेजीसह बंद झाले. हिंडाल्को, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक महिंद्रा बँक, एल अँड टी, महिंद्रा आणि महिंद्रा, मारुती सुझुकी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
जागतिक बाजारात दबाव
जागतिक बाजारात शुक्रवारी दबाव पहायला मिळाला. युरोप व आशियाई बाजारात निर्देशांक घसरणीसह कार्यरत होते.