सेन्सेक्स 390 अंकांनी वधारला ः टाटा स्टील मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱया सत्रात बुधवारी तेजीचा माहोल दिसून आला आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स तब्बल 390 अंकांनी मजबूत होत बंद झाला आहे. यावेळी धातू, बँक आणि आर्थिक क्षेत्रातील समभागांनी तेजी नोंदवली होती, त्यांचा लाभ हा भारतीय बाजाराला झाला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 390.02 अंकांनी वधारुन निर्देशांक 61,045.74 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 112.05 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 18,165.35 वर स्थिरावल्याची नोंद केली आहे.
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांपैकी टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक 2.72 टक्क्यांनी मजबूत राहिले असून सोबत लार्सन ऍण्ड टुब्रोही मजबूत तेजीत राहिले होते. यासह एचडीएफसी, विप्रो, भारती एअरटेल, एनटीपीसी, आयटीसी, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, सनफार्मा, पॉवरग्रिड कॉर्प, टायटन यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत. मात्र दुसऱया बाजूला टाटा मोर्ट्सचे समभाग सर्वाधिक 1.65 टक्क्यांनी घसरुन बंद झाले आहेत. यासह अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाला आहे.
निफ्टीमधील कामगिरी
निफ्टीमध्ये बुधवारी हिंडाल्कोचे समभाग 2.93 टक्क्यांनी तेजीत राहिले होते, यासोबत टाटा स्टील, लार्सन ऍण्ड टुब्रो, युपीएल व विप्रो हे तेजीसह बंद झाले. याससह टाटा मोर्ट्स, अदानी एन्टरप्राईजेससह अन्य कंपन्या नुकसानीत होत्या.
प्रमुख क्षेत्र
क्षेत्रानुसार पाहिल्यास धातू क्षेत्रातील निर्देशांक हे दोन टक्क्यांनी व कॅपिटल गुड्सचा निर्देशांक एक टक्क्यांनी वधारुन बंद झाला. तर बँक व औषध क्षेत्रातील निर्देशांकही 0.5 टक्क्यांनी वधारला आहे. यासह बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप काहीशा तेजीत राहिले होते.









