सेन्सेक्समध्ये 234 अंकांची वाढ, बँकिंग समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी दोन्ही निर्देशांकांमध्ये दिवसभरात चढ-उतार दिसून आला. बँकिंग, ऑटो तसेच धातू क्षेत्रातील समभागांच्या कामगिरीमुळे दोन्ही निर्देशांक दिवसअखेर वधारत बंद होण्यामध्ये यशस्वी झाले आहेत.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 234 अंकांनी वधारत 61,185 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 85 अंकांच्या तेजीसह 18,202 अंकांवर बंद झाला. सुरुवातीच्या सत्रामध्ये शेअरबाजार वधारासह कामगिरी करत होता. मात्र, मध्यंतरी दुपारच्या सत्रात बाजारामध्ये घसरणीचा कल दिसून आला. फार्मा, ग्राहकोपयोगी निर्देशांक आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या नकारात्मक कामगिरीमुळे बाजारात काहीसा दबाव दिसून आला. नंतर मात्र बँकिंग, धातू व ऑटो कंपन्यांनी बाजाराला सावरण्याचे महत्त्वाचे काम केले. स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्र आणि महिंद्रा, पॉवरग्रीड कॉर्प, ऍक्सिस बँक, भारती एअरटेल, टीसीएस, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले यांचे समभाग बाजारात तेजी राखून होते. या तुलनेत दुसरीकडे एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक, सनफार्मा, टायटन, डॉ. रेड्डीज लॅब्ज, इंडस इंड बँक, इन्फोसिस, एनटीपीसी, लार्सन अँड टुब्रो यांचे समभाग घसरणीसह बंद झालेले पाहायला मिळाले. स्टेट बँकेचा समभाग सर्वाधिक 4 टक्के इतका वाढून नव्या उच्चांकी भावावर व्यवहार करताना दिसला. सार्वजनिक बँकांचा निर्देशांक 4.5 टक्के इतका दणदणीत वधारलेला दिसला. याच्यासोबत निफ्टीतील धातू निर्देशांक 1.6 टक्के, ऑटो निर्देशांक 1.3 टक्के वधारताना दिसून आला. फार्मा निर्देशांक मात्र 1.4 टक्के घसरणीत होता. ग्लोबल हेल्थ यांच्या आयपीओने शेवटच्या दिवशी सहापट इतका गुंतवणूकदारांचा प्रतिसाद मिळवल्याचे दिसून आले. तर बिकाजी फूड्स यांच्या आयपीओनेही 20 पट इतका चांगला प्रतिसाद नोंदविला.
जागतिक बाजारात उत्साह
जागतिक बाजारांमध्ये आज तेजीचा माहौल होता. अमेरिकेतील नॅसडॅक निर्देशांक 132 अंकांनी वधारत होता. तर युरोपियन बाजारामध्ये मात्र मिश्र कल दिसून आला. आशियाई बाजारामध्ये तेजी राहिली होती. यात हँगसेंग सर्वाधिक 434 अंकांसह वधारत होता तर निक्की 327, कोस्पी 23, शांघाय कम्पोझिट 7 व जकार्ता कम्पोझिट 56 अंकांनी वधारत व्यवहार करत होता.








