अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘मराठी भाषेचा प्रवास’यावर बजरंग धामणेकर यांचे विचार
बेळगाव : मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, हेमाद्री पंडित, चक्रधर स्वामी, सावता माळी, संत तुकाराम, समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मोरोपंत, श्रीधर स्वामी यांच्यासारख्यांनी दिलेल्या योगदानामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे, असे विचार बाल शिवाजी वाचनालयाचे संचालक बजरंग धामणेकर यांनी व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहात तिसऱ्या दिवशी ‘मराठी भाषेचा प्रवास’ या विषयावर ते बोलत होते. मराठी भाषा टिकविण्यासाठी अनेकांनी त्याग केला आहे. मराठीची थोरवी गाताना ज्ञानेश्वर माऊलीपासून कोणीच कमी पडले नाही. मराठी भाषा सर्व समावेशक आणि सर्व क्षेत्रांना व्यापणारी आहे. तिला उदात्त धोरण आहे,
त्यामुळेच इतर भाषांतील अनेक शब्दही मराठीने सामावून घेतले आहेत. त्यामुळे मराठी प्रगल्भ झाली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. असे सांगून त्यांनी लीळाचरित्र, विवेक सिंधूसारख्या ग्रंथांचे योगदान प्रतिपादित केले. वारकरी संप्रदाय, समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या कार्याची महती त्यांनी गायली. आपल्या भाषेला सोलापूरच्या श्रीधर स्वामीजी, त्यानंतर अनेक शाहिरांनी, भूपाळीकारांनी, लावणीकारांनी, बखरकारांनी आणि वृत्तपत्रांनी ही भाषा वाढवली आहे. प्रारंभी कार्यवाह सुनीता मोहिते यांनी प्रास्ताविक केल्यावर अध्यक्ष अनंत लाड यांनी धामणेकर यांचा परिचय करून सन्मान केला. उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांनी आभार मानले. याप्रसंगी नेताजी जाधव व इतर संचालक, कर्मचारी व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवारचा कार्यक्रम
सोमवारी सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण कॉलेज हलकर्णीचे प्रा. संदीप मुंगारे हे मराठी साहित्यावर विचार व्यक्त करणार आहेत. याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









