मनोहर उर्फ बाबु आजगावकर यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी/ पणजी
मोपा विमानतळ प्रकल्प हा आपण खेचून आणला, अन्यथा तो कधीही पेडणेमध्ये होणार नव्हता. शिवाय धारगळ येथे उभारण्यात आलेल्या आयुष हॉस्पिटलासाठी आपण प्रयत्न केले, त्यामुळेच ते धारगळ येथे उभारले. तथापि आपण केलेल्या कामाची राज्यपातळीवर कोणी दखल घेतली नाही. कारण आपण बारिक समाजाचा प्रतिनिधी आहे, अशी खंत व्यक्त करून माजी उपमुख्यमंत्री बाबु उर्फ मनोहर आजगावकर यांनी मोपाला ‘मनोहर’ हे नाव दिले ते सार्थकी ठरल्याचे म्हणाले.
‘मनोहर’ विमानतळ प्रकल्प असे नामकारण करण्यात आल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील ‘मनोहर’ हे कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जरी हा प्रकल्प स्व. मनोहर पर्रीकर यांना समर्पित केलेला असला तरी मनोहर नावाच्या अनेक व्यक्ती आहेत. त्यातच या मतदारसंघाचे 4 वेळा प्रतिनिधीत्व करणारे माजी उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर यांचेही नाव मनोहर उर्फ बाबु असे आहे.
कार्यकर्त्यांचे फोनावर फोन
या संदर्भात बोलताना आजगावकर म्हणाले की, आपल्याला हजारो कार्यकर्त्यांचे फोनावर फोन येत आहेत. ते आपले अभिनंदन करीत आहेत. तथापि, आपण सर्वांना एकच सांगितले की, हा प्रकल्प मनोहर पर्रीकरांना समर्पित आहे. पर्रीकर हे राज्यव्यापी, राष्ट्रीय नेते होते, त्यांची तुलना अन्य कोणत्याही नेत्याशी करता येणार नाही. आपण बारिक समाजातील माणूस आमदार म्हणून निवडून येऊन उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो. जनतेने आपल्याला 4 वेळा निवडून आणले म्हणून मोप विमानतळ प्रकल्प उभारण्यापर्यंत कामे आपण केली.
प्रकल्पासाठी आपण उभारले आंदोलन
आपण स्वतः मोपसाठी आग्रह धरला. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी हा प्रकल्प गोव्यात आणला. आपण भाजपमध्ये असूनही या प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले. दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे अनेक नेते त्यावेळी राणे यांना त्रास देऊ लागले. मात्र आमच्या तालुक्यातील जनतेला रोजगार मिळेल म्हणून आपण या प्रकल्पासाठी आंदोलन उभारले व या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः मनोहर पर्रीकर हे देखील हजर होते.
आज मोपावर बोलणाऱयांचे मोपासाठी योगदा काय?
स्व. प्रमोद महाजन यांनी छोटय़ाशा गोव्यात जवळजवळ अशी दोन विमानतळे कधीच होऊ शकतच नाहीत, असे पर्रीकरांना सांगितले होते. मात्र आमच्यासारख्यांनी जोरदार आंदोलन करून हा प्रकल्प इथे खेचून आणला. आज जे मोपावरून क्रेडीट घेऊ पहात आहेत व मोपावरून बोलत आहेत त्यांचे मोपासाठी कोणते योगदान आहे, ते त्यांनी जाहीर करावे असे जाहीर आव्हान त्यांनी पेडणेतील एका नेत्याचे नाव न घेताच दिले.
आयुषसाठी जमीन आपण मिळवून दिली
पेडणेमध्ये आयुष हॉस्पिटल आणण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आपणच पुढाकार घेतलेला होता. आज प्रकल्पाच्या ठिकाणी भलत्यांचीच नावे! अशी टीका त्यांनी केली. पेडणेमध्ये वीज, पाणी, रस्ते इत्यादी आपण मिळवून दिले. मोप विमानतळ आणि आयुष हॉस्पिटलासाठी आपण जे काही योगदान दिलेले आहे त्याला तोड नाही. दुर्दैवाने आपल्या कार्याची सरकारी पातळीवर देखील नोंद घेतलेली नाही याचे दुःख आपल्याला झाले. परंतु मोपसाठी पेडणेतील युवकांना रोजगार मिळावा यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावा लागेल, असे बाबू आजगावकर म्हणाले.









