कराड :
आगाशिवनगर (ता. कराड) येथे गुरूवारी रवींद्र सुभाष पवार (वय 31, रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर) या संशयिताने हल्ला करून महिलेस गंभीर जखमी करून पलायन केले होते. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अथक प्रयत्न करत मध्यरात्री वराडे हद्दीत एका पुलाखाली लपून बसलेल्या संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथे एका 27 वर्षीय विवाहित महिलेवर भरदुपारी रस्त्यावर कोयत्याने एकाने खुनी हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या महिलेस नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यानंतर विवाहितेवर खुनी हल्ला केलेल्या संशयिताचे नाव रवींद्र पवार असल्याचे निष्पन्न झाले. हल्ला करून संशयित पसार झाला होता. रात्री उशिरापर्यंत पोलीस संशयिताचा शोध घेत होते. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी महामार्गावर संशयिताचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू ताशिलदार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अशोक भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज कोरडे, मोहसीन मोमीन, सज्जन जगताप, आनंदा जाधव, अमोल देशमुख यांच्यासह पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले. याच दरम्यान पोलिसांना संशयित वहागाव ते वराडे या दरम्यान एका पुलाखाली लपून बसल्याची माहिती मिळाली. रात्रभर तपास करत असलेल्या पोलिसांनी संपूर्ण परिसरात वेगाने तपासणी सुरू केली. यामधे संशयित वराडे हद्दीत आढळला. पोलिसांना पाहून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र रात्रीच्या अंधारातही पोलिसांनी संशयित हल्लेखोरास पाठलाग करून पकडले. दरम्यान, संशयित रवींद्र पवार याने हल्ला केलेली विवाहित महिला मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.








