बेळगाव : कंग्राळी खुर्दजवळ मार्कंडेय नदीत उडी टाकलेल्या इसमाचा दुसऱ्या दिवशीही शोध लागला नाही. रविवारी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत एचईआरएफ रेस्क्यू टीमने अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सायंकाळपर्यंत या प्रयत्नांना यश आले नाही. सचिन माने (वय 45), राहणार कंग्राळी खुर्द असे त्याचे नाव आहे. जीवनाला कंटाळून त्याने शनिवारी सकाळी मार्कंडेय नदीत उडी टाकली होती. शनिवारपासूनच पोलीस व एचईआरएफ रेस्क्यू टीमने शोधमोहीम सुरू केली होती. पहिल्या व दुसऱ्या दिवशी या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी रविवारी सायंकाळी मोहीम थांबवण्यात आली.
सोमवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेत एचईआरएफ रेस्क्यू टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ, राजू टक्केकर, संतोष भंडारी, शशिकांत आंबेवाडकर, शैलेश पवार, प्रकाश पाटील, अनंत पाटील आदींनी भाग घेतला. पाण्याखालील कॅमेऱ्यांचा वापर करून मार्कंडेय पुलापासून सुमारे दीड किलोमीटरपर्यंतच्या नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली. सचिनने नेमकी कोठून उडी मारली? याविषयी व्यवस्थित माहिती मिळाली नाही. त्यामुळे शोधमोहिमेत अडचणी येत आहेत. काही जणांकडून चुकीची माहिती पुरवण्यात आल्याने कुठून सुरुवात करायची व कोणत्या दिशेने मोहीम राबवायची? याविषयी निर्णय घेणे रेस्क्यू टीमला अवघड झाले आहे. त्यामुळे स्वत:च्या अंदाजाने त्यांनी मोहिमेला सुरुवात केली असून सोमवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.









