कळंगुट येथील घटना, हवालदार विद्यानंद आमोणकर जबर जखमी
म्हापसा : चित्रपटाला शोभेल अशा फिल्मी स्टाईलने पोलिसांच्या अंगावर कार घालून पळ काढणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले. ही घटना शुक्रवारी रात्री कळंगूट येथे घडली. या अपघातात हवालदार विद्यानंद आमोणकर गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कळंगुट पालिसांनी संशयित आरोपी संदीपकुमार राधाकृष्ण एम (26, रा. बंगळूर मूळ आंध्रप्रदेश) व वसंत देवेंद्र मडिवाल (32, रा. मजाळी कारवार) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती निरीक्षक मिलिंद भुईंबर यांनी दिली.
सदर घटना शुक्रवारी रात्री 11.30 वा.च्या सुमारास गौरावाडा कळंगूट येथे मेरिएट हॉटेलजवळ घडली. दोघेजण गोव्यात गुन्हेगारी कारवाई करण्यास आल्याची माहिती कळंगूट पोलिसांना लागली होती. त्यानुसार पोलीस पथक गौरावाडा येथे त्यांना पकडण्यास गेले असता हा थरार घडला. हे संशयित आरोपी केए 04 एनबी 8391 क्रमांकाच्या टाटा टियागो कारमध्ये होते. पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच वसंत मडिवाल याने कारचा दरवाजा उघडून पळ काढला. त्याचा काही पोलिसांनी पाठलाग केला तर पोलीस हवालदार विद्यानंद आमोणकर कारचालक संदीप कुमार याला पकडण्यास गेले असता त्याने कार मागे घेऊन आमोणकर याच्या अंगावर घातली. कारची धडक बसून विद्यानंद खाली पडले व कारखाली सापडले. त्यात त्यांचा पाय कारखाली अडकला. कारचालकाने त्यांना 100 मीटर अंतर फरफटत नेले व आमोणकर सुटून रत्यावर पडले. कार चालकाने तेथून वेगाने पळ काढला. यात आमोणकर यांच्या डोक्याला, कंबरेला व पायाला जबर मार लागला असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुऊ आहेत. त्यांचा पाय जायबंदी झाल्याचे वृत्त आहे.
कळंगूट पोलिसांनी याबाबत राज्यातील सर्व पोलिसांना सतर्क केले व सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. धारबांदोडा चेकनाक्यावर आरोपीला रोबर्ट वाहनामधील पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडले व कळंगुट पोलिसांच्या स्वाधीन केले. शिपाई अमीर गरड यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून खुनी हल्ल्याचे कलम दाखल केले आहेत. निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक राजाराम बागकर अधिक तपास करीत आहेत.









