‘हू पेंटेड माय मनी व्हाईट’ पुस्तकाच्या मराठी भाषांतर प्रकाशन कार्यक्रमात आवाहन : ‘प्रबुद्ध भारत’ संस्थेचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
‘भारताच्या खच्चीकरणाचे प्रयत्न सर्व शक्ती पणाला लावून करण्यात येत असून ते हाणून पाडणे येथील बहुसंख्याक समाजाचे उत्तरदायित्व आहे. त्यासाठी आपल्या अवतीभोवती काय चालले आहे, ते कोण आणि कोणत्या उद्देशाने करीत आहे, याची जाणीव करून घेतली पाहिजे. तसेच अत्यंत सावध आणि सजग राहिले पाहिजे, असे सूचक आवाहन ‘हू पेंटेड माय मनी व्हाईट, हाऊ अँड व्हाय’ या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ श्री अय्यर यांनी केले. ते येथील आयएमईआरच्या सभागृहात त्यांच्या या पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. हे भाषांतर प्रथितयश लेखक दीपक करंजीकर यांनी पेले आहे.
या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा कार्यक्रम ‘प्रबुद्ध भारत’ या संस्थेने आयोजित केला होता. व्यासपीठावर मूळ लेखक श्री अय्यर, या पुस्तकाचे मराठी भाषांतरकार दीपक करंजीकर यांच्यासह सतीश मेहता, सचिन सबनीस आदी मान्यवर उपस्थित होते. तन्वी इनामदार यांच्या गणेशस्तवनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
श्री अय्यर यांचे हे मूळचे इंग्रजीतून असणारे पुस्तक काल्पनिक असले तरी ते आपल्या देशासंबंधीच्या सत्य घटनांनाच प्रतिबिंबित करणारे आहे. तसेच आपल्या देशावर कशी आणि कोठून संकटे येत आहेत आणि त्यावर तोडगा कसा काढला पाहिजे, याचे मार्गदर्शन या पुस्तकात आहे. हे पुस्तक वाचताना आपल्याला अवतीभोवती घडणाऱया घटनांचेच दर्शन घडते आणि या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या किती गांभीर्याने घेतल्या पाहिजेत, याची प्रकर्षाने जाणीव होते, असे प्रतिपादन व्यासपीठावरील मान्यवरांनी केले.
धोका वेळीच ओळखणे आवश्यक
‘हू पेंटेड माय मनी व्हाईट’ हे पुस्तक प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेले निश्चलनीकरण (नोटबंदी), या निर्णयाची कारणे, त्याचे क्रियान्वयन आणि त्याचे परिणाम यांच्यावर आधारित आहे. मात्र, त्यात अनुषंगाने भारतातील बहुसंख्याकांचे खच्चीकरण कसे केले जात आहे, तसेच भारताच्या संस्कृतीवर कशा प्रकारे घाला घातला जात आहे, आणि भारताला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱया या कारस्थानाचे सूत्रधार कोण आहेत, या बाबींवर झगझगीत प्रकाश टाकण्यात आला आहे. हे उद्बोधक, वाचकाला वस्तुस्थितीची जाणीव करून देणारे आणि गांभीर्याने विचार करायला लावणारे पुस्तक असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले.
निश्चलनीकरणाची कारणे-परिणाम
500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी अचानक का घेतला, याची कारणमीमांसा अय्यर यांनी केली. पाकिस्तानने त्याच्या आवश्यकतेपेक्षा तिप्पट प्रमाणात नोटा छापण्याचा कागद खरेदी केला होता. त्याचा उपयोग भारताच्या 500 आणि 1000 रुपयांच्या बनावट नोटा छापण्यासाठी करण्यात आला. लाखो कोटी रुपयांच्या या नोटा पद्धतशीरपणे भारतात घुसवून भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे हे कुटिल कारस्थान होते. ते हाणून पाडण्यासाठीच केंद्र सरकारने निश्चलनीकरणाचा निर्णय घेतला. हा निर्णय खरेतर आणखी उशिरा घेतला जाणार होता. तथापि, पाकिस्तानचे कारस्थान अपयशी करण्यासाठी तो ठरल्यापेक्षा आधी घेण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुस्तकाचे भाषांतर का पेले?
या पुस्तकाचे भाषांतर मराठी वाचकांचे प्रबोधन करण्यासाठी करण्यात आले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करून भारताला निर्बल बनविण्याचा डाव कसा रचला जात होता, तसेच भारतातील अल्पसंख्याक समाजाला हाताशी धरून बहुसंख्याकांची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हानी करण्याची योजना कशी आहे, इत्यादी सत्य बाबी या पुस्तकामध्ये एका काल्पनिक कथेच्या आवरणात प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. ही वस्तुस्थिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे पुस्तक मराठीत आणले गेले आहे, असे प्रतिपादन भाषांतरकार दीपक करंजीकर यांनी त्यांच्या भाषणात केले. नंतर श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. अनिलकुमार गरग यांनी आभार मानले.
‘प्रबुद्ध भारत’ काय आहे?
प्रबुद्ध भारत ही संस्था 2012 मध्ये स्थापन करण्यात आली. सचिन इनामदार हे या संस्थेचे सूत्रसंचालक आहेत. सध्या मुख्य प्रवाहातील अनेक मीडिया असत्य आणि अर्धसत्य वृत्तांच्या आधाराने समाजाचा बुद्धिभेद करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा पक्षपातीपणाचा प्रतिवाद करून घडणाऱया घटनांची त्यांनी लपविलेली बाजू लोकांपर्यंत पोहोचविणे आणि लोकांचे प्रबोधन, भाषणे, चर्चासत्रे आदी कार्यक्रमांतून करणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.









