कोल्हापूर :
यल्लमा ओढ्यावरून सुभाषनगर ते शेंडा पार्क चौकापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या साईडपट्ट्यांवर भलेमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना हे खड्डे चुकवत वाट काढत जावे लागते. या खड्ड्यांमध्ये गाडी जाऊन अनेकदा अपघात झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तर रस्त्यावर असलेल्या स्पीड ब्रेकरच्या मध्यभागीच भलामोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे परिसरातील नागरिकांना मणक्याचे आजार वाढल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

सुभाषनगर ते शेंडा पार्क डांबरी रस्ता असूनही आर्धा रस्ता उकरलेला आहे. तर आर्ध्या रस्त्याच्या मध्यभागी खड्डे आहेत. हा रस्ता थेट शेंडापार्क, आर. के. नगर, खडीचा गणपती या भागात जातो. त्यामुळे नेहमीच या रस्त्यावर रहदारी असते. तसेच अनेकदा अवजड वाहनही या मार्गाने जातात. त्यामुळे एखादे अवजड वाहन चालले तर दुचाकीस्वारांना अर्धा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून जावे लागते. त्यामुळे हाड खिळखिळी होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. तसेच सुभाषनगर परिसरात काही भागात झोपडपट्टी व काही भागात पक्की घर आहेत. येथे कामगार, व्यावसायिक आणि जास्त करून चर्मकार समाजाचे लोक राहतात. या परिसरातील नागरिक वारंवार महापालिका प्रशासनाकडे या खड्ड्यांबाबत तक्रार करतात. परंतू महापालिका प्रशासनाने या परिसरातील समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांसह प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाकडून रस्त्यावर तात्पुरती डागडुजी केली जाते. परंतू काही महिन्यातच पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती या भागातील रस्त्यांची आहे.
सुभाषनगर परिसरातील मुख्य रस्त्यांच्या दूरवस्थेबद्दल रिक्षाचालकांकडून कायमच नाराजी व्यक्त केली जाते. तसेच सुभाषनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर गॅस पाईपलाईनसाठी खुदाई केली आहे. रस्त्यांवर मुरूम व माती टाकल्याने पावसामुळे चिखल झाला आहे. या चिखलातून वाहनचालक घसरून पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. तरीदेखील महापालिका याकडे लक्ष देत नसल्याचे नागरिक सांगतात. मुख्य रस्त्यावर पावसाचा जोर वाढल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. पाणी साचल्याने किती खोल खड्डा आहे याचा अंदाज प्रवाशांना येत नाही. परिणामी याचा प्रवाशांना, वाहनचालकांना त्रास होत आहे.








