खोदण्यात आलेली चर व्यवस्थित बुजविण्याकडे दुर्लक्ष

प्रतिनिधी /बेळगाव
शहरात 24 तास पाणी योजनेंतर्गत जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. तसेच डेनेज वाहिन्यादेखील घालण्यात येत आहेत. हिंदवाडीतील मुख्य रस्त्यावर जलवाहिनी घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. डाकबंगल्याजवळ मातीचे ढिगारे साचले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती व्यवस्थित करण्यात आली नसल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर दररोज वाहनांचे अपघात घडत आहेत.
रस्त्याची खोदाई केल्यानंतर दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार आणि कंपनीची आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्याची खोदाई करून संपूर्ण रस्ता खराब केला तरी महापालिकेचे अधिकारी मूग गिळून गप्प बसत आहेत. याचा फटका वाहनधारकांना सोसावा लागत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर जलवाहिन्या आणि डेनेज वाहिन्या घालण्यासाठी सातत्याने खोदाई केली जात आहे. हिंदवाडी परिसरातील रस्त्यांची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. येथील काँक्रिटीकरण करण्यात आलेला रस्ता वगळता एकही रस्ता व्यवस्थित नाही. डाकबंगला ते गोमटेशकडे जाणाऱया रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे. मात्र येथील रस्त्याच्या दुरुस्तीकडे गेल्या सहा महिन्यांपासून दुर्लक्ष करण्यात आले आहे. डाकबंगला ते गोमटेशपर्यंत खोदण्यात आलेली चर व्यवस्थित बुजविली नाही. रस्त्याच्या मध्यभागी असलेली ही चर वाहनधारकांना धोकादायक ठरत आहे. रस्ता खचल्याने वाहने कशी चालवायची, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. या रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. डाकबंगल्याजवळ जलवाहिनीच्या जोडणीसाठी खोदाई करण्यात आली होती. या ठिकाणी खोदण्यात आलेला खड्डा व्यवस्थित बुजविला नाही. त्यामुळे मातीचा ढिगारा साचला आहे. रात्रीच्यावेळी ये-जा करणाऱया वाहनधारकांना अडथळा ठरत आहे. याबाबत नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या, पण महापालिकेसह संबंधित विभागाच्या अधिकाऱयांनी व कंत्राटदारांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हिंदवाडीतील हा प्रमुख रस्ता वाहनधारकांना जीवघेणा बनला आहे. महापालिकेने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी होत आहे.









