ट्रकांची नोंदणी नसल्याने मच्छीमार खात्याची कारवाई : जेटीवर वातावरण तंग : अवजड ट्रकसह प्रवासी गाडय़ा अडकल्या जेटीवर
प्रतिनिधी / म्हापसा
मालीम जेटीवरील सर्व फिशरी ट्रेडर्सनी मासळी आयात निर्यात करणाऱया वाहन धारकांनी आपल्या गाडय़ा मत्स्य खात्याकडे त्वरित नोंद कराव्यात अन्यथा येथे येणाऱया गाडय़ाना प्रवेश बंद केला जाईल तसेच बाजूच्या पार्किंगमध्येही गाडय़ाना प्रवेश नाकारण्यात येईल असा इशारा मच्छीमार खात्याच्या संचालिका शर्मिला मोंतेरो यांनी मंगळवारी मालीम जेटीवर दिला. त्यानंतर बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या आदेशाचे पालन करीत मालीम जेटीवर मुख्य दरवाजाला टाळे लावण्यात आले.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे काहीवेळ वातावरण बरेच तंग झाले होते. यावेळी पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण केले. दरम्यान घटनेची गंभीरता पाहून सोसायटीचे अध्यक्ष, बोटमालक व इतरांनी मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्याकडे धाव घेऊन यासाठी येत्या सोमवार पर्यंतचा अवधी मागितला आहे.
आदेशाचे पालन झाले नाही : मंत्री हळर्णकर
बेती मालीम जेटीवर येणाऱया मोठय़ा ट्रेडर्सवाल्यांच्या सर्व गाडय़ा मच्छीमार खात्याकडे नोंद (रजिस्टर) कराव्यात असा आदेश 1 ऑगस्ट 2022 ला जारी केला होता, ट्रेडर्स संघटनेने याबाबत एक महिन्याचा अवधी मागितला होता. मात्र आज अडीच महिने उलटले तरी गाडय़ा नोंद करण्याबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे आता गेट बंद करण्यात आली आहे. अचानक हा आदेश दिला नाही अशी माहिती मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
मालीम जेटी परिसरात दुर्गंधी
मालीम जेटीवर अविनाश शिंदे व गौरीश साळगावकर यांनी आपल्या बोटीतील कुजलेले सुमारे दीड टन मासे बाहेर काढून ठेवल्याने ते सर्व कुजले आहेत. यामुळे या भागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. दरम्यान सोसायटीचे चेअरमन फ्रान्सिस डिसोझा यांच्या लेखी तक्रारीनंतर आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. याचा अहवाल आपण वरिष्ठ अधिकाऱयांकडे सोपविणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी एल्टन डिसोझा यांनी दिली.
सोसायटीच्या नावे दादागिरी बंद व्हावी ः अविनाश शिंदे
सरकारने केलेली कारवाई योग्य आहे. सोसायटीने येथे सतावणूक सुरू केली होती. सोसायटीच्या नावे सुरू असलेली दादागिरी बंद व्हायला पाहिजे. आमचे मासे आजही बोटमध्ये कुजत आहेत. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. यावर सरकारने तोडगा काढणे आवश्यक आहे असे बोट मालक अविनाश शिंदे म्हणाले.
अध्यक्षामुळे सर्वांना त्रास : गौरेश साळगावकर
आम्ही सर्व कागदपत्रे सोसायटीला सुपूर्द केली, मात्र आमची बोट येथे घेत नसल्याने नाईलाजाने आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागली. आमची बोट बेकायदेशीर नाही. आम्ही कर्नाटकातून आलेलो नाही. एका अध्यक्षामुळे सर्व बोटी अडकून पडल्या आहेत. दादागिरी करीत असल्याने त्यांच्या वाटेला कुणी जात नाही. तसे केल्यास नंतर सतावणूक केली जाते, असा आरोप बोट मालक गौरेश साळगावकर यांनी केला.
नोटीस न देताच टाळे लावले : फ्रान्सिस डिसोझा गेटची समस्या दोन वर्षापूर्वीची आहे, 2 लाख रु. भरून गाडय़ा नोंद करा असे आम्हाला सांगण्यात आले होते. तेव्हा बोट धारकांनी मागणी केली होती की वर्षाकाठी आम्ही मत्स्य खात्याला 23 लाख देतो, आमचे अन्य 2 लाख रुपये घेऊ नका. यातच मत्स्य संचालकांनी आम्हाला सामावून घेऊन आमची रितसर नोंदणी करावी. मात्र तसे काहीच झाले नाही. आता आम्हाला नोटीसही बजावली नाही. थेट येऊन गेटला टाळे लावले आहे, अशी माहिती मालीम जेटीवरील सोसायटीचे अध्यक्ष फ्रान्सिस डिसोझा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.









