सर्वत्र अंधार, ये-जा करणे धोकादायक : दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील सतत गजबजणाऱया कोल्हापूर सर्कल, संगोळ्ळी रायण्णा चौक, अशोक चौक, एसपी ऑफिस रोड आदी भागात रात्रीच्यावेळी वीज गायब होत असल्याने परिसर अंधारमय बनला आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी मुख्य रस्त्यावरून ये-जा करणे धोकादायक बनले आहे. मनपाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. तर हेस्कॉमचे गांभीर्य नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे स्मार्ट शहरातील पथदीप मात्र आता कुचकामी ठरताना दिसत आहेत.
शहरातील मुख्य रस्त्यावरच अंधार होत असल्याने वाहतूकही धोकादायक ठरत आहे. आधीच शहरात चोऱया व दरोडय़ाचे प्रकार वाढले आहेत. त्यातच महत्त्वाच्या रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधार पसरत असल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे. एकीकडे शहरात दिवसा पथदीप बंद करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विजेचा अपव्यय होताना दिसत आहे. तर दुसरीकडे मुख्य रस्त्यावर पथदीप बंद राहिल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत मुख्य रस्त्यावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली आहे. मात्र काही ठिकाणी स्ट्रीट लाईट सुरू आहेत. तर बहुतांशी भागात स्ट्रीट लाईट बंद आहेत. त्यामुळे नागरिकांनाही अंधारात चाचपडावे लागत आहे. तर काही ठिकाणी स्ट्रीट लाईट खांब बसविले आहेत. मात्र या खांब्यांवर दिवे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे रात्रीच्यावेळी सर्वत्र अंधार पसरत आहे. काही खांब्यांवर कमी व्हॅटचे लाईट बसविल्याने केवळ खांब्यापुरतचा उजेड आणि इतरत्र मात्र अंधार दिसून येत आहे.