शहरासह ग्रामीण भागात गल्लोगल्ली जागृती : मराठीसाठी एकत्र येण्याची हाक, जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय
बेळगाव : कन्नडसक्ती विरोधातील महामोर्चा सोमवार दि. 11 रोजी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली काढला जाणार आहे. धर्मवीर संभाजी चौक येथून सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होऊन कन्नडसक्तीला विरोध दर्शविणार आहेत. या महामोर्चासाठी शहरासह तालुक्यामध्ये जोरदार जागृती केली जात आहे. कर्नाटक सरकारकडून कन्नडसक्ती अधिकच तीव्र करण्यात आली आहे. कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर तर मराठीचे खच्चीकरण करण्यास सुरुवात झाली. बेळगाव शहराचा मानबिंदू असलेल्या महानगरपालिकेमधील मराठी फलक हटविण्याचे धाडस करण्यात आले. त्याचबरोबर इतर कार्यालयांमध्येही कन्नडसक्तीचा बडगा उगारण्यात आला आहे. भाषिक अधिकारांवर घाला घातला जात असल्याने संतापलेल्या मराठी भाषिकांनी जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेतला. मध्यवर्ती म. ए. समितीने या विरोधात महामोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे. शहरांसह ग्रामीण भागात गल्लोगल्ली महामोर्चासाठी जागृती केली जात आहे. पत्रकांचे वाटप करून कन्नडसक्तीचे गांभीर्य मराठी भाषिकांना पटवून दिले जात आहे. कोणताही पक्ष अथवा संघटनेत काम करा परंतु मराठीसाठी एकत्र या, अशी हाक दिली जात आहे.
शहापूर परिसरात जागृती
बसवाण गल्ली, शहापूर येथील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महामोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. नगरसेवक रवी साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला मोठ्या संख्येने मराठी भाषिक उपस्थित होते. शहापूर परिसरातील बसवाण गल्ली, पवार गल्ली, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली येथील नागरिकांनी महामोर्चाला पाठिंबा दिला आहे.
कंग्राळी खुर्द ग्रामस्थांचा पाठिंबा
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शुक्रवारी कंग्राळी खुर्द येथे कन्नडसक्ती विरोधी मोर्चाबाबत जागृती करण्यात आली. कंग्राळी खुर्द येथील ग्रामस्थांनी महामोर्चाला पाठिंबा देत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार केला. यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव अॅड. एम. जी. पाटील, बी. डी. मेहनगेकर, माजी ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, दिनेश मुतगेकर, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, रमेश पाटील, बी. एन. पुजारी, निंगोजी पाटील यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
म. ए. समितीची उद्या वडगाव येथे बैठक
कन्नडसक्ती विरोधात होणाऱ्या मोर्चाबाबत चर्चा करण्यासाठी रविवार दि. 10 रोजी वडगाव व जुने बेळगाव येथील कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिर येथे बैठक होणार आहे. यावेळी सर्व लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
म. ए. युवा समितीची आज बैठक
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक शनिवार दि. 9 रोजी होणार आहे. सायंकाळी 5 वा. कावळे संकुल टिळकवाडी येथील युवा समितीच्या कार्यालयात बैठक होणार असून यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.









