अनेक वर्षानंतर दृष्टीस पडल्याने नवीन पिढीला अप्रुप
डिचोली/प्रतिनिधी
धबधबा डिचोली येथील खाण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या मेंगनिजच्या गुफा स्थानिक युवकांना पुन्हा दृष्टीस पडल्याने या गावातील सदर गुफांच्या स्मृतींना उजाळा मिळाला. या गुफांबाबत अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता सदर गुफांना कोणतेही ऐतिहासिक महत्त्व नसून त्या खनिज खाणी सुरू होण्यापूर्वी भूगर्भातून मेंगनिज काढण्यासाठी अशा प्रकारची भुयारे मारण्यात येत होती. त्याचप्रमाणे धबधबा येथेही अशी हि दोन भुयारे आहेत, असे सांगण्यात आले.
धबधबा या गावात असलेल्या बारामाही नैसगिर्क स्रोतामुळे धबधबा हे नाव पडले आहे. पावसाळय़ात तर या धबधबा नावाचा गावातील धबधब्याला उधाण येत असते. मोठा पाऊस पडल्यानंतर फेसाळणाऱया या धबधब्याला न्याहाळण्यासाठी अनेक जण या धबधब्यावर येत असतात. या गावात खाण प्रक्रिया मोठय़ा प्रमाणात चालते. याच खाण प्रक्रीयेचा एक भाग म्हणजे ही भुयारे मारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
धबधबा येथील श्री तळेश्वर गोठणेश्वर मंदिराच्या परिसरात गंगा बारच्या समोर व सुनील गोवेकर यांच्या घरामागे अशा दोन ठिकाणी हि भुयारे आहेत. पूर्वी या भुयारांमध्ये स्थानिक लोक टॉर्च घेऊन फिरतही होते. खनिज माल काढण्यापूर्वी या भागातून मेंगनिज काढले जायचे. त्याची पडताळणी करण्यासाठी अशा प्रकारची लांबच्या लांब भुयारे मारून भुगर्भातील मेंगनिज शोधले जात होते. जर सदर ठिकाणी मेंगनिज मिळाल्यास ते काढण्यासाठी पुढील प्रक्रिया हाती घेतली जायची. अन्यथा सदर भुयारे तशीच सोडून दिली जायची. अशाच प्रकारची दोन भुयारे सध्या धबधबा येथे आहेत. या भुयारांमध्ये मेंगनिज ऐवजी शेड मातीच मिळाल्याने ती तशीच सोडण्यात आली आहेत.
या भागात झाडी वाढल्याने ती थेट लोकांच्या दृष्टीस पडत नव्हती. मात्र हल्लीच या भागातील अनावश्यक झाडे हटवून हा परिसर जमीन मालकांनी साफ केला आहे. त्यामुळे या भागात गेलेल्या काहीजणांना सदर भुयार दृष्टीस पडले. या भुयारांसंबंधी कोणतीही अधिक किंवा पूर्वीची माहिती नसल्याने त्याचे काही स्थानिकांना अप्रुप वाटले. आणि गावात ऐतिहासिक गुंफा आढळून आल्याची वार्ता सर्वत्र पसरली.
या बाबत बोलताना स्थानिक नागरिक शिवदास मोरजकर यांनी, सदर गुंफेचे महत्त्व जरी आम्हाला माहित नसले तरी या गुंफा परिसराचा विकास व्हावा. धबधबा या नावाप्रमाचेच या गावात वाहणाऱया धबधब्याला ज्याप्रमाणे ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याचप्रमाणे य गावातील या गुंफानाही काहीतरी महत्त्व असू शकते. असे सांगितले. व यावर अभ्यास व्हावा अशी मागणीही केली.
याविषयी गावातील एक नागरिक रामदास मयेकर यांना विचारले असात, धबधबा गावात खनिज खाण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मेंगनिज काढण्यात येत होते. त्याच अनुषंगाने याच परिसरात हि दोन भुयारे मारण्यात आली आहेत. पूर्वी आम्ही या भुयारांमध्ये बिनधास्त फिरायचो. परंतु नंतरच्या काळात या परिसरात झाडे झुडपे वाढल्याने जायला मिळत नव्हते. आता या भागातील झाडेझुडपे हटवून साफसफाई करण्यात आली असल्याचे ती दृष्टीस पडत आहे. त्यास ऐतिहासिक असे कोणतेही महत्त्व नसून ती भुयारे निव्वळ मेंगनिजच्या पडताळणीसाठी मारण्यात आली होती. असे सांगितले.









