रत्नागिरी :
फक्त विमान प्रवास करून मैफलींना जाणारे तालसम्राट उस्ताद झाकीर हुसैन ९ फेब्रुवारी २०१७ रोजी रत्नागिरीकरांच्या प्रेमाखातर रेल्वेने रत्नागिरीतील मैफलीसाठी आले होते. त्यावेळी रत्नागिरीकरांच्या आदरातिथ्याने ते खूपच भारावून गेले होते. त्यांचे संवादिनी साथीदार तथा रत्नागिरीचे सुपुत्र पं. अजय जोगळेकर यांच्यामुळेच झाकीरभाई येथे सादरीकरणासाठी आले. आर्ट सर्कलच्या कला – संगीत महोत्सवाच्या दशकपूर्तीनिमित्त झाकीरभाई येथे आले आणि त्यांनी आपल्या अलौकिक तबलावादनाने रत्नागिरीनगरीतील साडेतीन हजारांहून अधिक रसिकांची मने जिंकून थिबा राजवाडा परिसरात झालेल्या त्या महोत्सवाने शिखर गाठले. आर्ट सर्कलचे नितीन कानविंदे यांनी
उस्तादजींच्या आठवणींना उजाळा दिला.
कानविंदे म्हणाले, झाकिरजी मुंबईतून कोकणकन्या एक्स्प्रेसने रत्नागिरीत आले. त्यांच्यासमवेत न्यूयॉर्क येथील शिष्या, संवादिनीवादक पं. अजय जोगळेकर, पत्नी, मुलगी, आर्ट सर्कलचे भालचंद्र तेंडुलकर होते. त्यांचा रेल्वेचा प्रवास आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष व्यवस्था केली होती. सीएसटी स्थानकावर कोकण रेल्वेचे टीसी महेश पेंडसे यांनी त्यांचे स्वागत केले. रेल्वे प्रवासामध्ये उस्तादजींनी पं. जोगळेकर यांच्या कन्येसोबत भेंड्या खेळल्या, अनेक विषयांवर गप्पा देखील मारल्या.
रत्नागिरी रेल्वेस्थानकावर सकाळी साडेसहा वाजता ते उतरल्यानंतर आर्ट सर्कलच्या सदस्यांनी झाकीरभाईंचे जंगी स्वागत केले होते. त्याचवेळी पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी गेलेले नगराध्यक्ष राहुल पंडित यांनीही रत्नागिरीकरांच्यावतीने झाकीरभाईंचे हसतमुखाने स्वागत केले. त्यानंतर झाकीरभाई हे शहरानजीकच्या नारायणमळी येथील बंगल्यावर विश्रांतीसाठी गेले होते. तेथे झाकीर हुसेन यांचे आदरातिथ्य करण्यात आले.
नारायणमळी परिसरातील त्या वास्तव्यात सकाळच्या हवेतील गारवा व खाडी, सूर्याचे विलोभनीय दृश्य पाहून झाकीरभाई भारावले होते. त्यावेळी झाकीरभाईंनी ईशस्तवन केले आणि त्यादिवशी आर्ट सर्कलच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या गायकीचे अंग अनुभवता आले. रत्नागिरीत सूर्योदय पाहिला आता पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन घेऊन मी रत्नागिरीकरांचा निरोप घेईन, असे उद्वारही त्यांनी काढल्याचे कानविंदे यांनी सांगितले.








