नंदगड/वार्ताहर
श्री सुब्रम्हण्यम साहित्य अकादमी माचीगड यांच्या वतीने रविवार दि. 24 डिसेंबर रोजी 27 वे मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनात ग्रंथदिंडी, संमेलनाचे उद्घाटन, शिवाय विविध सत्रात संमेलन होणार आहे. यावेळी विविध मान्यवरांसह साहित्यिकांची उपस्थिती राहणार आहे.
संमेलनाध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे-ज्येष्ठ विचारवंत कोल्हापूर
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी उच्च शिक्षण मौनी विद्यापीठात खडतर अध्ययन केले. ग्रामीण विद्यापीठाच्या पदवी समकक्ष शिक्षक पदविकेत भारतात सर्वप्रथम, शालेय वयात साने गुरुजींचे साहित्य, वि. स. खांडेकरांचा सहवास, थोरामोठ्यांची व्याख्याने, आंतरभारती घडणमुळे आयुष्यभर समर्पित, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य म्हणून कार्यरत राहून निवृत्त झाले. भारतीय शिष्टमंडळाकडून युरोप, आशिया खंडातील 15 देशांचे अभ्यासदौरे, 2010 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी निवृत्तीनंतर अनाथांचे संगोपन व पुनर्वसन कार्यासाठी दोन दशके कार्य केले. आत्मकथा, लेखसंग्रह, कथासंग्रह, भाषण संग्रह, काव्यसंग्रह याशिवाय भाषांतर, संपादन, टिकात्मक लेखन केले आहे. त्यांच्या लेखनास महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) तसेच भारत सरकारचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत.
व्याख्याते अॅड. उदय मोरे-ज्येष्ठ विचारवंत
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात लोककल्याणकारी राजा श्री शिवछत्रपती या विषयावर अॅड. उदय मोरे यांचे व्याख्यान होणार आहे. उदय मोरे यांना शिरोळ श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लिमिटेड येथे सिव्हिल ओव्हरसीयर या पदाचा खूप वर्षाचा अनुभव आहे. भोगावती येथील साखर कारखान्यात 23 वर्षाचा अनुभव आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आम्ही महाराजांचे मावळे, धन्य ते संताजी धनाजी, आजचा विद्यार्थी दशा व दिशा, व्यसनमुक्ती, लेक वाचवा, ग्राम स्वच्छता, संत गाडगे महाराज इत्यादी विषयावर विविध व्याख्यानमालेतून महाविद्यालयात प्रबोधन केले आहे., आतापर्यंत त्यांची विविध ठिकाणी 1827 व्याख्याने झालेली आहेत. अनेक संस्थांच्या वतीने वेगवेगळे अनेक पुरस्कार सरांना प्राप्त झाले आहेत. सध्या ते भोगावती सहकारी साखर कारखाना येथे सेक्रेटरी पदावर कार्यरत आहेत.
संभाजी भगवान यादव
संमेलनातील तिसऱ्या सत्रात संभाजी यादव यांचा विनोदी कार्यक्रम होणार आहे. संभाजी यादव यांचे मूळ गाव राधानगरी तालुक्यातील कौलव, शाळांची गटसंमेलने, विविध वर्धापन दिन, गणेशोत्सव महाविद्यालयांची राष्ट्रीय सेवा शिबिरे, अशा अनेक प्रसंगी कलावंतांच्या नकला, पशुपक्षी, आर्केस्ट्रामधील वाद्य, यांचा मौखिक आवाज, विनोदी किस्से, अंधश्रद्धा निर्मूलन, त्याचबरोबर व्यसनमुक्ती, स्त्राrभ्रूण हत्या, भ्रष्टाचार अशा अनेक विषयांवर हसत खेळत प्रबोधन या माध्यमातून होतो. हसण्यासाठी जगा व जगण्यासाठी हसा या कार्यक्रमातून आजतागायत त्यांचे 2252 कार्यक्रम झालेले आहेत. या कार्यक्रमातून त्यांना महाराष्ट्रातील विविध संघ संस्थांचे 25 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
याशिवाय आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अंजली निंबाळकर, माजी आमदार अरविंद पाटील आदींसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.









